कोरोनाने घातला जगाला विळखाधोका त्याचा सर्वांनी ओळखा घाबरू नका, सतर्क रहा: पालकमंत्री


चंद्रपूर, दि. 20 मार्च (का. प्र.) : मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या आजाराने प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हादरली असली तरी याबाबत सत्य जाणून घेणे अत्यावश्यक आहे.कोरोना हा आजार एका विषाणुमुळे होतोय. या रोगाला (कोविड-19) असं नावही देण्यात आलंय. त्यामुळे कुणीही गोंधळून जायचं कारण नाही.या आजारापासून बचाव करण्यासाठी आपण फक्त सतर्क राहून काळजी घ्यायची आहे.

कोरोना विषाणूबद्दलच्या जागतिक आकडेवारीकडे नजर टाकली तर अशा परीस्थितीत लोकांच्या मनात भीती पसरणे साहजिक आहे.कोरोना हा रोग तसा धोकादायक नाही.परंतु, यापासून वृद्ध, हृदयाची समस्या,रक्तदाब,मधुमेह यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.यासह प्रवासात अथवा घराबाहेर विशेष सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे.महाराष्ट्रात कोरोना विषाणूची प्रकरणं वाढत आहे. परंतु, त्यांचे प्रमाण मुंबईत कमी असल्यामुळे कुणीही घाबरू नये. हवामानात बदलत होत असल्याने  ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे सर्वसाधारणपणे आढळू शकतात.हे कोरोना विषाणूच्या लक्षणाबरोबरच सामान्य आजाराची लक्षण देखील आहेत.ही लक्षणे आढळल्यास घाबरण्याची अथवा काळजी करण्याची नव्हे तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

देशात आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते रुग्ण परदेशात प्रवास करुन भारतात आले आहेत किंवा कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही परदेशातून प्रवास करून आलात किंवा अशा  व्यक्तींच्या संपर्कात आलात आणि तुमच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची प्रमुख लक्षणं आढळली असतील तर त्वरीत तपासणी करा.यासाठी आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन क्रमांक पुरवले  आहेत. विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करताना सुरु होणाऱ्या सुचनांच्या शेवटी हा हेल्पलाइन क्रमांक ऐकू येतो. या हेल्पलाइन क्रमांकवर फोन केल्यास तुम्हाला कोरोनाच्या चाचणी आणि उपचारासंदर्भात मदत प्राप्त होईल. त्याचप्रमाणे पुण्यात नायडू आणि मुंबईत कस्तूरबा रुग्णालयात उपचारांसाठी स्वतंत्रकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

सध्या तरी ‘कोरोना’वर उपचार करणारी कोणतीही लस उपलब्ध नाही किंवा विशिष्ट असे औषधही नाही. जगभरातील प्रयोगशाळांमध्ये ‘कोरोना’ आजारावर लस शोधून काढण्यासाठी युद्ध पातळीवर संशोधन सुरू आहे. ‘कोरोना’चे रुग्ण मृत्युमुखी पडतात, असेही नाही. यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यल्प आहे. ‘कोरोना’ची बाधा झाली, तरी रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. चीनमध्ये मृत्यूची सरासरी फक्त 3 टक्के एवढीच आहे.  कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही मात्र प्रत्येकानं सतर्क राहून खबरदारी जरूर घेतली पाहिजे. जर डिसेंबर ते मार्च या काळात तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील व्यक्ती चीन, इटली, कोरिया, इराण किंवा  अन्य मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित देशातून परतली असेल आणि काही दिवसांत त्यामध्ये  लक्षणं आढळू लागली तर 020-26127394 या राज्यस्तरीय मदत क्रमांकावर तसेच चंद्रपूर येथील माझे पालकमंत्री  जनसंपर्क कार्यालय, नियोजन भवन,  जिल्हाधिकारी  कार्यालय, नजीकच्या आरोग्य विभाग येथे संपर्क साधून उपचार घ्या.

अधिक माहितीसाठी चंद्रपूर जिल्हयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय 07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226,चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 या संपर्क क्रमांकाचा वापर करावा.

अशी घ्या कोरोनापासून काळजी :

प्रवासातून आल्यावर साबण, पाणी किंवा हँड सॅनिटायझरनं हात स्वच्छ धूवा, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा.टिश्यू वापरला असेल तर तो लगेच फेकून द्या.हात स्वच्छ धुवा,हात स्वच्छ न धुता डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळा.आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाणं टाळा.

अफवांना आणि गैर समजांना बळी पडू नये:

समाजात असे अनेक गैरसमज निर्माण झालेले दिसतात. चिकन, अंडी यांसारखे पदार्थ कोरोनाला बाधक असल्याची अफवा पसरवली जात आहे.या अफवांमुळे या उद्योगाला त्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून हा विषाणू पसरू शकत नाही. कारण 55 टक्के अंशापेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंतच राहत नाही.त्यामुळे कोणत्याही अफवांना किंवा गैरसमजांना बळी पडू नये.

आपल्या राज्यातील आरोग्य खाते संबंधित यंत्रणा राज्याचे स्वास्थ्य सुखरूप राहावे याकडे विशेष लक्ष देत आहे. आपणही त्यांच्या प्रत्येक आदेशांचे पालन तथा सहकार्य केले पाहिजे. राज्यातील आरोग्य विभाग, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. जिल्ह्यांमध्ये जमावबंदी अर्थात 144 कलम सुद्धा लागू केलेली आहे. प्रत्येक प्रवाशांची तपासणी विविध स्तरावर सुरू आहे .यावेळी सुजाण नागरिक म्हणून आपणही पुढे यावेत आवश्यक तिथे प्रशासनाला मदत करावे असे आवाहन मी करतो.

प्रशासन या आजार संदर्भातील माहिती आपल्याला माध्यमांद्वारे देत आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. खबरदारी म्हणून गर्दीची ठिकाणं टाळा जेणे करून कोरोना व्हायरसचा प्रसार होणार नाही.