एंजल देवकुळे : गडचिरोलीच्या खनिजामधील अस्सल हिरा : जिला माहिती अधिकारी सचिन अडसुळ

एंजल देवकुळे : गडचिरोलीच्या खनिजामधील अस्सल हिरा : जिला माहिती अधिकारी सचिन अडसुळ

गडचिरोली 9 मार्च :  गडचिरोली हा विविधतेने नटलेला महाराष्ट्रातील निसर्ग संपन्न जिल्हा आहे. या जिल्हयात अनेक प्रकारचे खनिज उपलब्ध आहे. याचप्रमाणे येथील माणसातील गुणवैशिष्टयेही खनिजाप्रमणे समोर येताना दिसत आहेत. या खनिजामधीलच एक अस्सल हिरा एंजल देवकुळे देशभर नाहीतर जगभर झळाली देत आहे. सामान्यांना अनोळखी असलेल्या स्कॉय मार्शल आर्ट या खेळात राज्यातील कोप-यात असणा-या जिल्हयातून तिने चमकदार कामगिरी करून जगभर लौकिक मिळविला आहे. गडचिरोली जिल्हयाची ओळख निर्माण करण्यात या छोटया मुलीने महान कतृत्व करून दाखविले आहे. महिल्या दिनाच्या निमित्ताने तिच्या विषयीच्या काही गोष्टी आपल्यासाठी.
इयत्ता 6 वीत शिकणा-या मुलीने देशाचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांना कौतूक करण्यास भाग पाडले.  बाल वयोगटात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. ती आपले प्रेरणा स्त्रोत आपले आई वडील स्वाती देवकुले, विजय देवकुले व प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांना मानते. युनायटेड किंगडम येथील वर्ल्ड रेकॉर्ड युनिवर्सिटी कडून तिला ग्रॅण्डमास्टर हा किताब मिळाला आहे. यातूनच तिला राष्ट्रपती कार्यालयात विशेष अतिथी म्हणून विविध कार्यक्रमाला आमंत्रित केले जात आहे. 2018 मध्ये दक्षिण कोरीयातील तिस-या जागतिक स्पर्धेत तिची कामगिरी सवोत्तम ठरली. तिने यावेळी 2 सुवर्ण पदकांचा वेध घेत सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच या खेळात ती जगातील सर्वात तरूण खेळाडू, आशिया खंडाबरोबर जगात सर्वात तरूण पहिली सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू ठरली. अशा अनेक विक्रमांना तिने गवसणी घातलेली आहेच. त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ग्लोबल एशिया पॅसिफीक रेकार्ड, ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्कॉय मार्शल आर्ट खेळातील एका मिनीटात सर्वात जास्त 181 स्ट्रायक हीट्स मारण्याचे विक्रम तिने केले आहेत. अशा या गडचिरोली कन्येने आत्तापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर वेगवेगळया 57 सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे.
एंजल 12 वर्षाची युवा खेळाडू गडचिरोलीतील स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेत शिक्षण घेत आहे. वडील औषध व्यवसायात आहेत तर आई गृहिणी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून तिला आई-वडीलांनी या खेळात खूप सहकार्य केले. तिला प्रोत्साहन देण्याबरोबरच तिला खेळासाठी तयार करणे, तिचा योग्य आहार, व्यायाम अशा तयारीत दोघांनीही मोठे परिश्रम घेतलेले आहेत. शाळेतील मार्गदर्शन आणि प्रशिक्षक संदिप पेड्डापेली यांनी तिला तयार करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. प्रशिक्षक संदिप यांनी घेतलेल्या मेहनीतीचे सार्थक तिने मिळविलेल्या पदकांमधून अधोरेखित होताना दिसून येते आहे. अतिशय शांत आणि संयमी खेळाडू म्हणून तीला नावाजले जाते. ती घरी आणि शाळेमध्येही सतत हसत व शांत स्वभावानेच वावरते. कोणत्याही आई-बाबाला आवडेल असे कतृत्व तिने सिध्द करून दाखिवले आहे. मुलगा व मुलगी असा लिंगभेद माणणा-या लोकांना लाजवेल असे कार्य या मुलीने केल्याने तिची आठवण महिला दिनी होणे आवश्यक आहे. महिला कोणत्याही बाबतीत पुरूषांबरोबर बरोबरीने आहेत हे तिने सिध्द कले आहे.
प्रायोजकाची गरज : आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला जाणे व त्या पध्दतीची तयारी करणे यासाठी मोठया प्रमाणात पैसा लागतो. यासाठी आई-वडील खर्च करत आहेतच मात्र कधी-कधी कसेबसे काम भागून जाते. यासाठी प्रत्येक मोठया शहरात इतर खेळाडूंना प्रायोजक लगेच मिळून जातात. एंजल साठी प्रायोजक मिळत नसल्याची माहिती तिचे प्रशिक्षक सांगतात. तयारी करणे, प्रवास आणि राहणेकरीता खूप मोठया प्रमाणात निधी लागतो. यासाठी लवकरच तिलाही प्रायोजक मिळेल ही अशा आम्हा सर्वांना आहे असे प्रशिक्षक संदिप सांगतात.
या मुलीच्या यशस्वी कामगिरीमधून जिल्हयातील इतर पाच मुलेही नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्कॉय मार्शल आर्टच्या संघात निवडली गेली. गडचिरोलीच्या मातीत जन्मलेली मुली-मुलं आता विविध खेळाबरोबरच शिक्षण व व्यावसाय क्षेत्रात चमक दाखवित आहेत. भविष्यात जिल्हयातील असे अनेक अंधारीतील हिरे आपला दिव्य प्रकाश जगासमोर आणण्यास तयार आहेत.