कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा गरजेची : हेमराज बागुल

   महिला जनजागृतीसाठी पब्लिक रिलेशन्स सोसायटीचा पुढाकार 

 नागपूर, दि. 9 : कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असली तरी जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून त्यास प्रतिबंध करता येणे शक्य आहे. यासाठी समाजात व्यापक जनजागृती करण्याची गरज असून सर्व पातळ्यांवर त्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन माहिती संचालक हेमराज बागुल यांनी येथे केले. विशेषत: विविध प्रकारच्या कर्करोगाचा मुकाबला करण्यासाठी महिलांनी प्राथमिक स्तरावरच त्याबाबत सजगता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
     जागतिक महिला दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने एचसीजीएनसीआरआय हॉस्पिटल येथे आयोजित कर्करोग जनजागृती कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विकीरणोपचार व कर्करोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. अजय मेहता, डॉ. सुचित्रा मेहता, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, जनसंपर्क अधिकारी एस. पी. सिंग, कवयित्री शबनम खान उपस्थित होते.
         नागपूरसह विदर्भात कर्करोगाचे प्रमाण मोठे असून त्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनातून होणा-या कर्करोगाचा लक्षणीय वाटा आहे, अशी माहिती देऊन श्री. बागुल म्हणाले, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय आहे. कर्करोगावर  अद्ययावत व सर्वसामान्यांना परवडणारे उपचार उपलब्ध करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
        राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने नागपुरात जामठा परिसरात नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल सुरु केले असून, त्यामधून विदर्भातील अनेक रुग्णांना फायदा होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागपूरसह मध्य भारतातील कर्करुग्णाना प्रगत, अद्ययावत आणि एकत्रितरित्या प्रभावी उपचार मिळत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यदायी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गरीब रुग्णांना कर्करुग्णांवर सुलभतेने उपचार मिळत आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गरीब व गरजूंना दिलासा देणारी उत्तम योजना असल्याचे यावेळी श्री. बागुल यांनी सांगितले. कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता, त्याविरोधातील व्यापक लढाईसाठी शासनासोबतच विविध खासगी व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे माहिती संचालकांनी यावेळी सांगितले.  
         विकीरणोपचार व कर्करोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना कर्करोगाच्या लक्षणांची माहिती दिली. रुग्णांनी आरोग्याबाबत सजगता दाखवल्यास कर्करोगाचे प्राथमिक स्तरावरच निदान  होणे शक्य असल्याचे सांगून ते म्हणाले, कर्करोग झाल्याचे कळल्यानंतर रुग्णांनी मानसिक सक्षमता दाखवून योग्य औषधोपचार करण्यासाठी प्रयत्न करावेत. सि्त्रयांच्या बाबतीत कुटुंबातील पुरुषांनी अधिक जबाबदारीने भूमिका बजवावी. महिलांनी वाढत्या वयासोबतच कर्करोगाच्या शक्यता गृहित धरुन त्या दृष्टिने प्रतिबंधासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कर्करुग्ण, त्यांचे वाढते प्रमाण, कारणे, निदान व उपचार आदिंबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली. तसेच कर्करोग होण्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करुन ते म्हणाले,  या आजारामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, आणि सामाजिक हानी होते. आरोग्याबद्दलची अनास्था दूर करुन योग्यवेळी निदान व उपचार केल्यास कर्करोग नक्कीच बरा होतो, असे श्री. कांबळे यांनी सांगितले. 
     कर्करोगावर धैर्याने यशस्वी मात करणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री शबनम खान यांनी कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये भितीपोटी आलेली अस्वस्थता आणि त्यावर मात करतानाचा संघर्ष काव्यातून सांगितला.
    यावेळी माहिती संचालक हेमराज बागूल व मान्यवरांच्या हस्ते रुग्णालयाच्या वतीने महिलांसाठी प्रिव्हीलेज कूपन प्रकाशन करण्यात आले. रुग्णालयात 14 मार्चपर्यंत महिलांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
      कार्यक्रमाला माजी जनसंपर्क विभागप्रमुख प्रा. के. जी. मिसार, एम. एम. देशमुख, प्रसन्ना श्रीवास्तव, राम जेट्टी यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जनसंपर्क गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एस. पी. सिंग यांनी ‘जागतिक महिला दिन व होळीच्या शुभेच्छा देत प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विशद केली. तर श्रीमती शोभा धनवटे यांनी आभार मानले.