पुणे, दि.1 अप्रैल (प्रतिनिधि) : निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करतांना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 106 जणांना ट्रेसिंग करुन त्यातील 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.