सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास चंद्रपूर जिल्हयात 200 रुपये दंड


    जिल्हयात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

   जिल्ह्यातील सिमेंट उद्योगाला आजपासून सुरुवात

   शेल्टर होम मधील मजुरांना रोजगार उपलब्ध करणार

   महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण

    जिल्हा सीमा ओलांडणाऱ्यांना होम कॉरेन्टाइन अनिवार्य

चंद्रपूर, दि.20 एप्रिल (जिमाका) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेळोवेळी सूचना व आदेश देत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचना, नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे. नागरिकांनी महत्त्वपूर्ण बाबींचे पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

         आज या संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडीओ संदेश देतांना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नये यासाठी अतिशय मर्यादित स्वरूपात तपासणी करून काही उद्योगांना सुरुवात करण्यात येत आहे आजूबाजूला 2 जिल्हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे चंद्रपूरमध्ये येणाऱ्या नव्या कोणत्याही प्रवासाची तपासणी अनिवार्य आहे. अशा व्यक्तीला होम कॉरेन्टाइन करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहे.जिल्ह्यात मर्यादित स्वरूपात मात्र केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत सिमेन्ट उद्योगाच्या काही कारखान्याना सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे.

सार्वजनिक स्थळी मास्क आवश्यक:

सर्व सार्वजनिक ठिकाणी,कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य राहील. सदर व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याचे आढळून आल्यास त्यास रु. 200  दंड आकारण्यात येईल आणि 3 मास्क देण्यात येणार आहे. दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे, वाहतुकीचे ठिकाणांचे प्रभारी यांनी त्याठिकाणी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) चे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी तसेच भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघटनेने, व्यवस्थापकाने 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याची परवानगीस मज्जाव असून.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या,गुटखा, तंबाखु यांचे विक्री करणाऱ्यावर सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत.

उपरोक्त आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचेविरुध्द दंडात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270, 271 नुसार कारवाई करण्यात येईल.

उपरोक्त आदेशातील दंडात्मक व फौजदारी कार्यवाही पोलीस विभाग, संबधीत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत प्रशासनाने करावी. तसेच दंड केलेल्या व्यक्तीस दंडाची कार्यवाही करणाऱ्या विभागाने 3 मास्क दयावे, असे स्पष्ट केले आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 193 प्रकरणात एकूण 11 लाख 37 हजार 970 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 701 वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

कोटा येथील मुलांसाठी हेल्पलाईन:

राजस्थान येथील कोटा या शहरात विविध अभ्यासक्रमासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील मुलांना परत आणण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक लोकांनी विनंती केली आहे.जिल्हा प्रशासन या मुलांना परत आणण्याबाबत राज्य शासनाकडून परवानगी घेत आहे. यासंदर्भात अनेक मुलांसोबत जिल्हा प्रशासनाकडूनही संपर्क झालेला आहे. तथापि, कोटा येथून मुलांना परत आणताना चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मुलांना एकत्रित आणता यावे यासाठी सर्व मुलांची यादी गोळा करणे सुरू आहे. ज्यांची मुले कोटा येथे अभ्यासक्रमासाठी असतील त्यांनी कार्यालयीन वेळेत ०७१७२-२५०६५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संजय राईंचवार यांनी केले आहे.

शेल्टर होम मधील मजुरांना रोजगार:

सध्या जिल्ह्यामध्ये मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश,तेलंगाना,छत्तीसगड आदी विविध भागातील मजूर मोठ्या प्रमाणात शेल्टर होम मध्ये थांबले आहे.या सर्वांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ आहे.मात्र पुढील 3 मेपर्यंत शासनाने आंतर जिल्हा, आंतरराज्य, जाणे-येणे बंद केलेले आहे. त्यामुळे या मजुरांना राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु,या काळात देखील त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक ठिकाणी आवश्यक ते सामाजिक अंतर व सुरक्षितता पाडून काम देण्याचा प्रस्ताव शासनाने त्यांच्या पुढे ठेवला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये शासनाच्या शेल्टर होम मध्ये 794 विविध बांधकाम ठेकेदाराकडे 6 हजार 386, गोसेखुर्द सारख्या मोठ्या प्रकल्पावर 1203 अशा एकूण 8383 मजुरांची संख्या आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 85 नागरिकांची नोंद करण्यात आली.  77 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 76 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. 1 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 975 आहे. यापैकी 2 हजार 176 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 27 हजार 799 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 96 आहे.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.