चंद्रपुर जिल्ह्यात 3 मे पर्यंतच्या लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात यावे : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार   जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

   शहरी भागातील 3 रुग्ण आढळल्याचे वृत्त चुकीचे

   होम कॉरेन्टाईन रुग्णांणी नियमांचे पालन करावे

   रस्त्यावर गर्दी वाढविणे 144 कलमाचे उल्लंघन

   घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य

    घरपोच सेवा व ऑनलाईन डिलिव्हरीला मुबा

    शेतीमालाच्या वाहतुकीला पूर्ण परवानगी

     कापूस, तूर,धान, खरेदी विक्रीला परवानगी

    जिल्ह्यात 684 वाहने जप्त 164 केसेस दाखल

चंद्रपूर दि. 17 एप्रिल (जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही मात्र याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. 3 मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर पडणे 144 कलमाचे उल्लंघन ठरेल. त्यामुळे नागरिकांनी काटेकोर नियमांचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज दिले आहेत.

        जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडीओ संदेश देताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर शहरात काही रूग्ण आढळल्याची अफवा आज होती मात्र अशा प्रकारे कोणतेही रुग्ण आढळलेले नाही. देशात आणि महाराष्ट्रात तसेच लगतच्या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी आपल्या आजूबाजूच्या घरात नव्याने कोणी आल्यास त्याची तपासणी होणे गरजेचे आहे पोलीस प्रशासनाने 52 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. याशिवाय राजुरा तालुक्यातील धानोरा, सोनुर्ली,आर्वी, देवाडा, कोलगाव, वरोडा, गोवरी, साखरवाही, खामोना, पाचगाव, इसापूर, सोनापूर, विहीरगाव, नोकारी, अंतरगाव, अन्नूर, चंदनवाही, अक्सापुर, गोजोली, पोडसा, नंदाप्पा, पुनागुडा, येल्लापूर, देवलागुड्डा, आंबेझरी, धनकदेवी आदी गावांनी स्वतःच्या गावाच्या रक्षणासाठी अतिशय आदर्श पद्धतीने काम सुरू केले आहे. ही वेळ प्रत्येकांनी एकमेकाला मदत करण्याची असून स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन यांनी मिळून गावामध्ये नवीन येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद ठेवावी त्याची माहिती संबंधित विभागाला द्यावी,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. ज्यांना अन्नधान्याची आवश्यकता आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. प्रथम आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोणीच उपाशी राहणार नाही याबाबतची दक्षता घेतली जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत यासाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्ह्यात यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये शिव भोजन योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. 2400 शिवभोजन थाळी विक्री केली जात आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने मिराशी बेघर लोकांना मदत केली जात आहे.

शेतीमालाची वाहतूक ,पशुखाद्य, पशु औषधी ,कीटकनाशके, खते बियाणी ,आदींच्या वाहतूक व विक्रीला कोणतेही निर्बंध ठेवण्यात आलेले नाही. शेतीच्या कामाला शेतकऱ्यांना सुरुवात करता येईल ,मात्र त्यासाठी सामाजिक दुरी राखणे आवश्यक आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत संचारबंदी उल्लंघनाच्या 164 केसेस दाखल करण्यात आले आहे. 43 जणांना अटक करण्यात आली असून 684 वाहने जप्त करण्यात आली आहे. रस्त्यावर दुचाकी विनापरवाना फिरवणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 77 नागरिकांची नोंद करण्यात आली.  69 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 65 नमुनेही निगेटिव्ह निघाले आहेत. 04 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 28 हजार 863 आहे. यापैकी 2 हजार 643 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 26 हजार 220 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 72 आहे.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.