लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या 563 वाहनांची जप्ती; 37 जणांना केली अटकजिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; 28 अहवाल निगेटिव्ह


चंद्रपूर दि. 13 एप्रिल (जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात तपासणी मोहीम सुरू असून कोणत्याही क्षणी उद्रेक नाकारता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरीच राहावे, ही प्रशासनाची विनंती असताना विनाकारण फिरणाऱ्या 563 वाहनधारकांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. 126 केसेस करण्यात आल्या असून 37 जणांना अटक करण्यात आली आहे.

       प्रशासनामार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने मिळाव्यात अशी तारेवरची कसरत सुरू आहे. यासाठी प्रत्येक घरातील एकाच व्यक्तीने 1 आठवड्यात एकदाच बाहेर निघून जीवनावश्यक वस्तू घरात घेऊन जाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. वाहनांचा वापर न करता पायीच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी असेही स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही ही अनेक नागरिक निर्देश मोडून घराबाहेर विनाकारण पडत आहे. सध्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरीही खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक घराची तपासणी सुरू आहे. कोरोना आजाराच्या संक्रमण शक्तीला बघता दुर्लक्ष केल्यानंतर रुग्ण संख्या वाढण्याचे आतापर्यंतचे उदाहरण आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या पद्धतीने पुढील 30 एप्रिल पर्यंत घरातच राहणे आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येत असून उद्यापासून आणखी सक्तीने वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत 563 वाहने जप्त करण्यात आली असून सात लाख 94 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

         दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 47 नागरिकांची नोंद करण्यात आली.  39 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 28 नमुनेही निगेटिव्ह निघाले आहेत. 11 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 27 हजार 584 आहे. यापैकी 2 हजार 925 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 24 हजार 659 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 45 आहे.
      दरम्यान, प्रशासनाने जाहीर केलेल्या विविध दूरध्वनी क्रमांकाचा लाभ घेऊन नागरिकांनी घर बसल्या मदत मिळवावी तसेच स्वयंसेवी संस्थांनी देखील अतिशय कमी कार्यकर्त्यांमध्ये गरज असेल त्या ठिकाणी मदत पोहोचवावी अशी विनंती करण्यात आली आहे.

        महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी शहरात निर्जंतुकीकरनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली असून अनेक भागांमध्ये नाकाबंदी केली आहे. ही नाकाबंदी नागरिकांची अडवणूक करण्यासाठी नसून कोरोना प्रसार होणार नाही यासाठी आहे. नाकाबंदी केलेल्या अनेक भागात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, एम्बुलेंस हावी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.