पूर्ण देशाचे लॉकडाऊन वाढले ;जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळीत पुरवठ्याचे प्रशासनाचे नियोजन लॉकडाउन मध्ये 659 वाहने जप्त ; 43 नागरिकांना अटक


Ø  जिल्ह्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा

Ø  जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही

Ø  नागरिकांनी मास्कचा वापर कायम ठेवावा

Ø  ग्राम सुरक्षा दलाच्यामार्फत गावात निगराणी

Ø  जिल्ह्याच्या सीमा सील;गावांच्या सीमा बंद

Ø  शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी

Ø  कृउबामध्ये निर्जंतुकीकरण ; नाक्यावरही  निर्जंतुकीकरण

Ø  रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन आग्रही

Ø  659 वाहने जप्त ; 43 नागरिकांना अटक

Ø  श्वसनाचा त्रास असणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू

Ø  हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.14 एप्रिल (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील 18 दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मात्र या काळात गरिबातील गरीब जनतेला अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था नियोजित असून पुरेसा अन्नसाठा जिल्ह्यात आहे. नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता राहील. यासाठी प्रशासन तयार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

        आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. यासंदर्भात राज्य शासनाचे सविस्तर निर्णय प्रतीक्षेत आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,रेशन दुकानामार्फत होणारा पुरवठा, याबाबत जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

     21 लाख लोकसंख्या असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 3 लक्ष 93 हजार रेशन कार्ड धारक आहे. या माध्यमातून 15 लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये 2 रुपये किलो दराने गहू व 3 रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा केला जातो. सोबतच  ज्यांच्याकडे  रेशन कार्ड नाही .अशा 40 हजार नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यांना देखील जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच गावागावांमध्ये शासकीय यंत्रणेसोबत स्वयंसेवी संस्था निराश्रित, निराधार, बेघर ,लोकांना तयार अन्न पुरवीत आहेत. या परिस्थितीत कोणाची उपासमार होत असेल किंवा अन्नधान्यापासून वंचित असल्यास जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी घराबाहेर न पडता अशा नागरिकांना मदत करण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकांचा उपयोग करावा ,असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

         दरम्यान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 58 नागरिकांची नोंद करण्यात आली.  50 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 32 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. 18 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 27 हजार 662 आहे. यापैकी 2 हजार 859 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 24 हजार 803 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 55 आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.

         महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात शहरात निर्जंतुकीकरण सुरू केले आहे.सोबतच  येणाऱ्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर कडेकोट नाकाबंदी केली आहे. शिवाय छोटे मार्ग नागरिकांची गर्दी वाढू नये बंद केले आहे. नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करावे, लॉकडाऊन संपेपर्यंत सहकार्य करावे,असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

           जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात देखील पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला आहे. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने येणाऱ्यांची नोंद केली जात आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांमधून घुसखोरी होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे, तसेच रस्त्यावर दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्याचे व विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत 659 वाहने जप्त करण्यात आली असून 145 केसेस करण्यात आले आहे. 43 लोकांना अटक करण्यात आली असून ही संख्या दुर्दैवी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

        जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्वसणाच्या आजाराच्या संदर्भात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. 100 डिग्री पेक्षा अधिक असणारा ताप, खोकला श्वसनासाठी होत असलेला त्रास कोणाला असल्यास यासंदर्भात नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हामध्ये श्वसनाच्या संदर्भातील रुग्णांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.कोणत्याही रुग्णाला अशा पद्धतीने अधिक त्रास होत असल्यास आवश्यक दूरध्वनी करून 108 सुविधा घरपोच रुग्णाला रुग्णालयापर्यंत तपासणीसाठी घेऊन जाईल. या सुविधेचा देखील लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.