बदनापुरातील तरुणांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली


लोकतंत्र की आवाज़, न्यूज़ नेटवर्क
जालना / बदनापूर, दि. 04 अप्रैल : कोरोना रोगाच्या मुकाबल्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदीमुळे परजिल्हा, परराज्यातून आलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे काही मजूर आपआपले ठिकाणे सोडून पायीच रस्त्याने प्रवास करून आपले घर जवळ करत असल्याचे विदारक चित्र असतानाच या उपासी असणाऱ्या  वाटसरूंना जेवण, नाश्ता पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून येथील सेवानगर तांडा येथील तरुणांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन व जमावबंदी असल्यामुळे परजिल्हयातील व पर राज्यातील मजूर व हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू झालेली आहे. अशातच काही ठिकाणी ठेकेदारांनी या मजुरांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आता काय करावे या विवंचणेत हे मजूर हतबल होऊन व सद्य परिस्थितीत होत असलेली उपासमार व इतर समस्यामुळे आपआपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असेच अनेक जण औरंगाबाद – जालना या महामार्गावरून पायी अंतर कापून आपआपले घर जवळ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. हे वाटसरू कोठून आले, कोठे चालले या बाबत सर्वसाधारणपणे कल्पना येत नसते, परंतु अशा वाटसरूंना बदनापूर तालुक्यातील सेवानगर तांडा येथील गणेश राठोड हे निस्वार्थपणे जेवण, पाणी, नास्ता वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. राठोड हे त्यांचे सहकारी स्वरूप राठोड, अमोल राठोड, गोरख राठोड, देवीदास चव्हाण यांच्या सहकार्याने खाद्य पदार्थ व पाणी बॉटल  एका पिशवीत ठेवतात व पायी जात असलेल्या वाटसरूंना हे वाटप करतात, या छोटेखानी कृतीतून त्यांनी मानुसकीची प्रचिती दिलेली दिसून येते.