नागपुर निवारा केंद्र ठरताहेत बेघरांच्या सक्षमतेचे केंद्र, बेघरांना आत्मनिर्भर करण्यासाठी कौशल्य विकास अनेक उपक्रम आयोजित ,महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ,बेघरांना नवीन कपडे, दाढी आणि केश मेक ओव्हर



लोकतंत्र की आवाज़ ,चंद्रपुर न्यूज नेटवर्क

नागपुर निवारा केंद्र ठरताहेत बेघरांच्या सक्षमतेचे केंद्र 

बेघरांना आत्मनिर्भर करण्यासाठी कौशल्य विकास अनेक उपक्रम आयोजित

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून 

बेघरांना नवीन कपडे, दाढी आणि केश मेक ओव्हर

नागपुर, 16 अप्रैल (प्रतिनिधि) :
बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महानगरपालिका नागपुर तर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपुर शहरातील रस्ते, फुटपाथवर राहणा-या या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लॉकडाउनचा अभिनव फायदा करून घेतला जात आहे.
नागपुर शहरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांच्या पुढाकाराने नियमित निवाऱ्यासोबतच तात्पुरत्या शहरी बेघर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भागातील एकूण २० बेघर निवाऱ्यात १२५२ जणांनी आसरा घेतला असून नागपुर मनपातर्फे चहा, नाश्ता व दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय तेथे करण्यात येत आहे. पोटाची भूक भागविताना या बेघरांच्या संपूर्ण सुरक्षेचीही पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. पहिल्यांदा निवारा केंद्रामध्ये आलेल्या बेघरांची अवस्था केश वाढलेले, मळकट कपडे, मळलेले शरीर अशी होती. निवारा केंद्रामध्ये आणल्यानंतर त्यांचे केश कापण्यात आले, रोज आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या बेघरांसाठी नवीन कपडे देण्यात आले आहेत. एकूणच नागपुर महानगरपालिका आयुक्तांनी संकल्पना आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून या बेघरांचे पूर्णत: ‘मेक ओव्हर’ झाले आहे.
अन्न आणि स्वच्छतेसह या बेघरांच्या कौशल्यांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. रस्त्यावर राहणा-या बेघरांना आत्मनिर्भर करून लॉकडाउन नंतर त्यांना सक्षमतेने जीवन व्यतित करता यावे यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसीत केले जात आहे. या बेघरांना वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सुतार कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे फलित म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून सुंदर स्वरूपाचे पक्ष्यांचे घरटे तयार झाले. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना दिलासा देण्या-यांमध्ये आता या बेघरांचेही हात पुढे आले आहेत. याशिवाय पाककलेच्या प्रशिक्षणात सर्वांनी जलेबी सुद्धा बनविली. विशेष म्हणजे या निवारा केंद्रांकरिता व तिथे राहणा-या बेघरांच्या सुविधा आणि प्रशिक्षणाकरिता अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातूनच हे सर्व कार्य सुरू आहे.

बेघरांचे सन्मानाने जगणे मान्य व्हावे
या सर्व उपक्रमाची माहिती देताना नागपुर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाउनमध्ये रस्त्यावर, फुटपाथवर राहणा-या बेघरांची दुरावस्था होउ नये याकरिता महानगरपालिकाने त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात केली. मात्र लॉकडाउन नंतरही या बेघरांनी रस्त्यावरच जीवन व्यतित करू नये. ते या समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांनी आपले सामाजिक जीवन स्वीकार करावे व समाजानेही त्यांचे सन्मानाने जगणे मान्य करावे यासाठी महानगरपालिकाने त्यांच्या कौशल्य विकासाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यादृष्टीने या निवारा केंद्रातील नागरिकांमधील कौशल्य शोधून त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सुतारकाम, बुट बनविणे, स्वयंपाक काम यासारख्या विविध कामांमध्ये रुची असणा-यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्यात येते. जेणे करून पुढे हे नागरिक दुस-यांवर निर्भर न राहता ते स्वयंसक्षमतेने जीवन जगू शकतील, असेही त्यांनी सांगितले.