नागपुर येथे कोरोनापासून मुक्त झालेल्या रुग्णाला मेयोमधून सुट्टी , डॉक्टर व नर्सनी टाळ्या वाजवून केले स्वागत


लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क

नागपूर, दि. 23 अप्रैल  :  एम्प्रेस सिटी येथे कोरोना बाधित रुग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दिनांक 28 मार्च रोजी तेलंगणा एक्सप्रेसने नागपुरात दाखल झालेल्या या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना मेयो हास्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.  
एम्प्रेस सिटी येथे राहणाऱ्या कोरोना योद्धा याला आज हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच कोरोना मुक्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सुद्धा केले.  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय  केवलिया, डॉ. सागर पांडे, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पराते, कोविडच्या प्रमुख डॉक्टर राखी जोशी, डॉ. रवि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णावर उपचार करण्यात आले. 

कोरोना मुक्त झालेला रुग्ण दिनांक 17 मार्च  रोजी वृंदावन (दिल्ली) येथून तेलंगणा एक्सप्रेसने नागपुरात दाखल झाला होता. त्यांना कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यावर दिनांक 28 मार्च रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली.  त्यामध्ये पॉझिटिव्ह विशेष वॉर्डात भरती करण्यात आले. चौदा दिवसानंतर पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 14 व 18 एप्रिल रोजी सुद्धा पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर 21 एप्रिल व 22 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये निगेटिव्ह आढळून आल्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. सागर पांडे यांनी दिली.
कोरोनावर उपचार घेत असताना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करताना कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांनी न घाबरता डॉक्टरांना सहकार्य केल्यास कोरोना मुक्त होवू शकतो. त्यामुळे उपचारासाठी बाधित रुग्णांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोरोना मुक्त झालेल्या व आज सुट्टी  मिळालेल्या व्यक्तीने केले.