वणी येथील अवैधरित्या मद्यविक्री करणा-या अक्षरा रेस्टॉरंटचा परवाना रद्द , जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कायमस्वरूपी परवान रद्द केले

 पाच जणांवर गुन्हे दाखल, 

 15 लक्ष रुपयांचा मद्यसाठा जप्त

       यवतमाळ, दि. 12 अप्रैल : साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा-या वणी येथील अक्षरा रेस्टॉरंट ॲन्ड बारचा परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणुचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन सुरू आहे. सोबतच  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीसुध्दा या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्य वाहतूक करताना आढळून आल्याने रवी गुलाबराव सरोदे यांच्या मालकीच्या मे. अक्षरा रेस्टॉरंट व बार यांची अनुज्ञप्ती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केली आहे.
दिनांक 10 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री वणी येथील मे. अक्षरा रेस्टॉरंट व बारच्या मागील बाजूस असलेल्या सुगम हॉस्पिटल जवळ पोलिस विभागाच्या पथकाने धाड टाकली असता येथे वाहनांमध्ये अवैध मद्यसाठ्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी प्रवीण गुलाबराव सरोदे, नंदकिशोर उर्फ बादशहा रामराव रासेकर, भारत अंबादास सावंत, सुहास मारोतराव टेंबरे हे चार इसम मोठ्या प्रमाणात मद्य वाहतूक करताना आढळून आले. या चारही इसमांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 14 लक्ष 73 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उपरोक्त चार व्यक्ती तसेच बार मालक रवी गुलाबराव सरोदे अशा एकूण पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. वरील पाचही व्यक्ती मे. अक्षरा रेस्टॉरंट व बार सोबत संबंधित असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. 
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावली अस्तित्वात आहेत. त्यामुळे पूर्णपणे मद्यविक्री व मद्य वाहतूक बंद असताना अनुज्ञप्ती धारकाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाचे तसेच केंद्र शासनाने आदेशित केलेल्या संपूर्ण ब्लॉक डाउनचे उल्लंघन केले आहे. 
तसेच या प्रकरणातील आरोपींनी गैरमार्गाने आर्थिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे साथरोग नियंत्रण कायद्याचे व जिल्हाधिका-यांनी पारीत केलेल्या आदेशाचे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन झाले आहे. तसेच मुंबई विदेशी मद्यनियम 1953 चे देखील उल्लंघन करण्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 56 (1)(ब) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अक्षरा रेस्टॉरंट व बार, एफ. एल. -3 अनुज्ञप्ति क्रमांक 152 कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.