यवतमाळ विलगीकरण कक्षातील आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह, सात जण इतर राज्यातील तर एक यवतमाळ जिल्ह्यातील

       यवतमाळ, दि.08 अप्रैल (जिमाका)  : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. यापैकी सात जण दुस-या राज्यातील असून एक जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे. सात जणांपैकी चार उत्तर प्रदेशचे, दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे. हे सातही जण तबलिगी समाजाशी निगडीत आहेत. तर पॉझेटिव्ह असलेला आठवा व्यक्ति या सात जणांच्या संपर्कात आला होता.
विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एकूण 65 जण भरती आहेत. यापैकी 51 जणांचे रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले. 14 जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझेटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकाच्या घराशेजारील भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरातील इतर कुटंबिय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांनासुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 89 आहे.