यवतमाळ जिल्ह्यात चार दिवसात दोन रेस्टॉरंट ॲन्ड बारचे परवाने कायमस्वरुपी रद्द , जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये कारवाई , हॉटेल सिटी पॉईंट बार ॲन्ड रेस्टारंटच्या चार जणांविरुध्द गुन्हे दाखल


    

यवतमाळ, दि. 13 अप्रैल : साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा-या महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील हॉटेल सिटी पॉईंट बार ॲन्ड रेस्टॉरंटचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच वणी येथील अक्षरा रेस्टॉरंट ॲन्ड बारचा परवाना रद्द करण्यात आला होता. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये चार दिवसांत दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटचे परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची ही दुसरी कारवाई आहे.
    कोरोना विषाणुचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन सुरू आहे. सोबतच  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीसुध्दा या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्य वाहतूक करताना आढळून आल्याने हिवरा (संगम) येथील हॉटेल सिटी पॉईंट बार ॲन्ड रेस्टॉरंटच्या कुणाल शिवप्रसाद जयस्वाल, विजय माणिकराव चव्हाण, शैलेश दिनेश जयस्वाल आणि कल्पेश शिवप्रसाद जयस्वाल या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी कुणाल जयस्वाल व विजय चव्हाण यांना अटकसुध्दा करण्यात आली आहे.
 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर हॉटेल सिटी पॉईंट बार ॲन्ड रेस्टॉरंट येथे धाड टाकली असता मागच्या दरवाज्यातून कुलाण जयस्वाल व विजय चव्हाण हे अवैधरित्या मद्यविक्री करतांना आढळून आले. त्यांच्याजवळ एका प्लॅस्टिक पिशवीत रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिलीच्या 12 बॉटल असा एकूण 2580 रुपयांचा मुद्देमाल सापडला. सदर मद्यसाठा जप्त करून पोलिसांनी कुणाल जयस्वाल व विजय चव्हाण यांना अटक केली. या प्रकरणात रेस्टॉरंटशी संबंधित अनुज्ञप्तीधारक शैलेश जयस्वाल व कल्पेश जयस्वाल यांच्यासह सर्व चार आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई), भांदवि 269, 188 व राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005 चे कलम 51 (ब) तसेच महाराष्ट्र कोव्हिड – 19 उपाययोजनेचे कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 तसेच या प्रकरणातील आरोपींनी गैरमार्गाने आर्थिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे साथरोग नियंत्रण कायद्याचे व जिल्हाधिका-यांनी पारीत केलेल्या आदेशाचे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन झाले आहे. तसेच मुंबई विदेशी मद्यनियम 1953 चे देखील उल्लंघन करण्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 56 (1)(ब) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हॉटेल सिटी पॉईंट रेस्टॉरंट ॲन्ड बार एफ. एल. -3 अनुज्ञप्ति क्रमांक 232 कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.