चंद्रपूर शहरात पुरेसा पाणीपुरवठा, नागरीकांची काळजी घेण्यास मनपा सक्षम - मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार


लोकतंत्र की आवाज़,चंद्रपूर

चंद्रपुर २७ मई (का प्र) :  शहरात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पुरेसा पाणीपुरवठा केला जात असुन गरज भासल्यास टँकरद्वारे पुरवठाही वेळोवेळी करण्यात येत आहे. सध्या काही समाजमाध्यमांवर मनपाची पावती दर्शवून चुकीचा संदेश पसरविला जात आहे.  जर मनपाकडून कोणी वैयक्तिक वापरास पाण्याची मागणी केल्यास त्यांना विहित शुल्क आकारून पाणीपुरवठा केला जातो, तसेच मागणी करणाऱ्यांजवळ स्वतःचे पाणी टँकर असल्यास फक्त पाण्याचे शुल्क आकारून त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येते. शहरातील नागरीकांना पाणी देण्यास मनपा सक्षम असल्याचे मा. महापौर राखी कंचर्लावार यांनी स्पष्ट केले आहे.   

    दरवर्षी उन्हाळ्याच्या  दिवसांत पाण्याची मागणी वाढते त्यातच यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली, कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना मनपा यंत्रणेद्वारे यशस्वीपणे राबविली जात आहे. 

महानगरपालिकेच्या यंत्रणावर या कामांचा अतिरिक्त ताण असतांनाही पालिका प्रशासन सातत्याने पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेऊन आहे. लॉकडाऊनमुळे नागरीक घरीच असल्याने पाण्याच्या मागणीत अतिरिक्त वाढ झाली असून, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरीता अधिकारी व कर्मचारी नियोजनपूर्वक कार्यरत आहेत. शहरातील सर्व भागात पुरेसा पाणीपुरवठा केला जात असून गरज भासल्यास टँकरद्वारे पुरवठाही वेळोवेळी केला जात आहे.    

     अश्यात समाजमाध्यमांवर पाणी पुरवठयासंबधी चुकीची माहिती पसरविली जात असून मनपाकडून जर कुणी पाणी  घेऊन इतरत्र देत असेल तर याचा अर्थ मनपा पाणी देण्यास सक्षम नाही असा होत नाही. शहरवासीयांसाठी पाणी पुरवठ्याची सर्वतोपरी काळजी घेण्यास मनपा सक्षम आहे. मनपाकडून पाणी घेऊन आपण स्वतः पाणीपुरवठा केल्याचा बनाव व श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही राजकीय व्यक्तींनी दिशाभुल करण्याच्या दृष्टीने उन्हाळा संपतांना ( मे महिन्यात ) केला आहे. 

    महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ८ टँकरच्या माध्यमातुन मार्च महिन्यात ४०१, एप्रिलमधे १,१५९ तर मे महिन्यात १३५३ अश्या २९१३ फेऱ्यांद्वारे मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तसेच विविध भागात उभारलेल्या १११ सिंटेक्स टाक्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार टँकरच्या माध्यमातून शहरातील नागरीकांना पाणीपुरवठा करण्याचे काम उपलब्ध संसाधनांद्वारे मनपा इमानेइतबारे करत आहे आणि यापुढेही करतच राहणार असल्याचे मा.महापौर यांनी सांगितले आहे. 

शहरात पाण्याचा मुबलक पुरवठा होत असतांना काही भागात टिल्लूपम्पमुळे पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आल्याने यापुढे कोणीही अतिरिक्त पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील काही नागरिक अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून सर्रासपणे टिल्लूपंपचा वापर करतात त्यामुळे शहरात काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन बऱ्याच जणांना पुरेसे पाणीच मिळत नसल्याचे समोर आल्याने यापुढे एकदा टिल्लूपंपची जप्ती केल्यानंतर परत मिळू शकणार नाही.