यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत , प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना निर्गमित


यवतमाळ, दि. 01 जून (जिमाका) : यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या असून या सूचना 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील. 
संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खालील बाबी या प्रतिबंधीत राहतील. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर आदरतिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरेंटला अन्नपदार्थ घरपोच देण्याची मुभा राहील. सर्व सलून, स्पा, ब्युटीपार्लर, सर्व आठवडी बाजार, सर्व ढाबे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील. कपड्याच्या दुकानामधील ट्रायल रुम बंद तसेच विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये.
सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फुट अंतर ठेवणे आवश्यक आहे. (सामाजिक अंतर) दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, ह्याची दक्षता दुकान मालकाने घ्यावी. लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतू लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही. अंत्यविधी प्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्ठ नागरिक, अनेक व्याधी असणारे व्यक्ती, गरोदर माता, 10 वर्षाखालील मुले यांना टाळेबंदी (Lockdown) काळात अत्यावश्यक कामाचे, आरोग्याचे कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही.  
सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपावेतो खालीलप्रमाणे मुभा राहील. टु‍ व्हिलर – 1 व्यक्ती (चालक), थ्री व्हिलर – 1+2 व्यक्ती, फोर व्हिलर – 1+2 व्यक्ती, टॅक्सी, कॅब आणि रिक्शा - 1+2 व्यक्ती. जिल्ह्यांतर्गत वाहतूकीसाठी वेगळ्या वाहन पासची आवश्यकता असणार नाही. यवतमाळ जिल्ह्यांतर्गत सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपावेतो बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेनुसार सुरु करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु सामाजिक अंतर व स्वच्छतेची उपाययोजना करणे आवश्यक राहील. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपावेतो या कालावधीत सर्व दुकाने, बाजारपेठ सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु दुकाने, बाजारपेठ येथे गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील ह्यांची सर्वांनी नोंद घ्यावी. 
औषधी दुकाने (मेडीकल), दवाखाने, पशुवैद्यकीय चिकित्सालये व औषधी दुकाने (24X7) सुरु राहतील. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत उद्योग (शहरी व ग्रामीण) सुरु राहतील. खाजगी आस्थापने सुरु राहतील त्यांचे कार्यालयीन वेळेनुसार म्हणजे सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत. शासकीय कार्यालयीन वेळेनुसार सर्व शासकीय कार्यालये 100 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यासह सुरु राहतील. वैद्यकीय आपात्तकालीन सेवेची वाहतूक सुरु राहील. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपावेतो खाद्यगृहामधून तयार खाद्यपदार्थ्यांची घरपोच सेवा सुरु राहील. ईलेक्ट्रीसियन्स, प्लंबर इत्यादी तसेच गॅरेज, वर्कशॉप इत्यादी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपावेतो सुरु राहणार आहे. 
वरील सर्व आस्थापने/प्रतिष्ठाने/सेवा व इतर सर्व बाबींसाठी वेगळ्या परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता असणार नाही. परंतु वर नमुद वेळेतच आस्थापने/प्रतिष्ठाने/सेवा सुरु राहतील व दिलेल्या वेळेनुसारच बंद होतील, याची नोंद घ्यावी. सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित ग्रामीण व शहरी क्षेत्रास लागू राहतील. यवतमाळ जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्यात येत आहे. सदर कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात कलम 144 अन्वये कार्यवाही करण्यात येईल. वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.