१५ मे पासून आतापर्यंत ३१ लाख ५५ हजार ८१३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई, 10 जुलाई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 10 जुलै 2020 या काळात 31 लाख 55 हजार 813 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 28 हजार 683 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

घाऊक विक्रेत्यांकडून मद्यखरेदी करून त्याची विक्री करण्याची परवानगी अनुज्ञप्तीधारकांना मिळावी अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली होती. सध्या उद्योगक्षेत्रावरील आर्थिक अडचणी व रोजगार टिकविण्याच्या दृष्टीने कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुढील आदेशापर्यंत घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे राज्यातील सुमारे 15,200 अनुज्ञप्ती व त्यावर अवलंबित सुमारे 1 लाख मनुष्यबळास मोठा दिलासा मिळणार आहे.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,933 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या काळात 1 लाख 43 हजार 656 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 38 हजार 497 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/ निरीक्षक / दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल दि. 9 जुलै  2020 रोजी राज्यात 129 गुन्हे नोंदविण्यात आले असून 85 आरोपींना अटक करण्यात आली असून 22 लाख 04 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासून दि. 9 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 10,735 गुन्हे नोंदविण्यात आले असून 5,297  आरोपींना अटक करण्यात आली असून  940  वाहने जप्त करण्यात आली असून 28 कोटी 04 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com  ई-मेल आहे.