कोविड-19 मध्‍ये सेवा करताना मृत झालेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांच्‍या अवलंबितांना 30 दिवसाच्‍या आत शासकीय सेवेत सामावून घेण्‍यात यावे – आ. सुधीर मुनगंटीवार #SudhirMungantiwar

कोविड 19 मध्‍ये सेवा करताना मृत झालेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांच्‍या अवलंबितांना 30 दिवसाच्‍या आत शासकीय सेवेत सामावून घेण्‍यात यावे – आ. सुधीर मुनगंटीवार

कोविड 19 मध्‍ये सेवा करीत असताना मृत झालेल्‍या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वारसांना 30 दिवसांच्‍या आत अनुकंपा तत्‍वावर विशेष बाब या सदराखाली शासकीय सेवेत सामावून घेण्‍यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात अस्तित्‍वात असलेल्‍या शासन निर्णयात त्‍वरीत सुधारणा करावी असेही आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री, सार्वजनिक आरोग्‍य मंत्री व मुख्‍य सचिवांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.  
या मागणी संदर्भात आपली भूमीका विशद करताना आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे की, गेले सहा महिने संपूर्ण देश कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावामुळे उदभवलेल्‍या महामारीचा सामना करीत आहे. कोविड 19 चा सामना करताना शासन सेवेतील डॉक्‍टर्स, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी असे विविध घटक सुध्‍दा कोरोनाच्‍या विळख्‍यात सापडून मृत्‍युमुखी पडले आहेत. आपल्‍या जीवावर उदार होवून हे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा सामना करीत आहेत व त्‍यात त्‍यांचा जीवही गेला आहे. आता ही संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यामुळे कोविड 19 मध्‍ये सेवा करीत असताना मृत झालेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वारसांना 30 दिवसाच्‍या आत शासकीय सेवेत सामावून घेण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आहे. शासकीय सेवेत असताना मृत झालेल्‍या कर्मचा-यांच्‍या अवलंबितांना अनुकंपा तत्‍वावर नोकरी देण्‍याबाबत शासन निर्णय अस्तित्‍वात आहे. यात त्‍वरीत सुधारणा करून कोविड 19 मध्‍ये सेवा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा मृत्‍यु झाल्‍यास त्‍यांच्‍या अवलंबितांना 30 दिवसाच्‍या आत प्राधान्‍याने, अग्रक्रमाने नोकरी देण्‍यात यावी अशा आशयाची सुधारणा करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. या पध्‍दतीची सुधारणा शासन निर्णयात केल्‍यास कोरोनाच्‍या विरोधात लढा देताना अधिकारी व कर्मचा-यांना आपल्‍या कुटूंबाच्‍या सुरक्षीततेबाबत शाश्‍वती मिळेल असेही आ. मुनगंटीवार यांनी शासनाला पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.