चंद्रपुर महानगरपालिका तर्फे विसर्जनासाठी 20 कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशांची उभारणी

मनपातर्फे विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशांची उभारणी  
 
चंद्रपूर २२ ऑगस्ट (का प्र) : २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन झाले असून यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने उत्सव साजरा करताना दिशानिर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता श्री गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० कृत्रिम तलाव व २०  निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे.  
    शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने उत्सवाप्रसंगी निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. यंदा घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करावे आणि सार्वजनिक मंडळाने तेथेच जवळपास व्यवस्था करून विसर्जन करावे. इतर सर्व मूर्तींचे विसर्जन पुर्णपणे कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.  
मागील वर्षी  १५ निर्माल्य कलश व २२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. यावर्षी २० कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. यात झोन क्र. १ (कार्यालय)  - २, दाताळा रोड,इरई नदी - २, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका - 1, तुकुम प्रा.शाळा (मनपा,चंद्रपूर) - २, नटराज टॉकीज (ताडोबा रोड)-२, गांधी चौक-1,छत्रपती शिवाजी चौक-२, रामाळा तलाव- 4, महाकाली प्रा. शाळा-1, नेताजी चौक बाबुपेठ-2 , झोन क्र. ३ (कार्यालय) -1 असे एकुण २० कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. 
  संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या छायेत आलेला आहे. गणेशाचे आगमन होताना दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी जाऊ नये आणि विसर्जन घरीच करावे. हे सर्व करून आपणच विघ्नहर्ता बनावे आणि कोरोनाचे संकट या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दूर करावे. नागरिकांनी आपल्या जवळच्या कृत्रिम तलावात श्रीमुर्तीचे विसर्जन करून कोव्हीड - 19 विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

    निर्माल्य कलश

1) झोन क्र. १ (अ) - ६
2) झोन क्र. १ (ब) - २
3) झोन क्र. २ (अ) - ८
४) झोन क्र. ३ (अ) - १
५) झोन क्र. ३ (ब) - २
६) झोन क्र. ३ (क) - १

    एकूण -२०