भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूरचा क्रांती लढा सोनेरी पान : ना. विजय वडेट्टीवार
चंद्रपूर दि. १६ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर हा क्रांती लढा एक सोनेरी पान म्हणून कायम स्मरणात आहे. चिमूरच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची 'करो या मरो ' ही भूमिका आणि दीशा राष्ट्रीय स्तरावर निश्चित केली,असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन ,मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता चिमूर येथील हुतात्मा स्मारकाला भेट दिली. १६ ऑगस्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी क्रांतीकारकांनी युनियन जॅक खाली उतरवून भारतीय ध्वज फडकवला होता. सारा देश गुलामीत असताना सतत तीन दिवस चिमूर शहर स्वतंत्र झाले होते. त्यामुळे दरवर्षी १६ ऑगस्टला चिमूर शहरात शहीदांना आदरांजली अर्पण करण्याचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रथम हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर किल्ला परिसरातील शहीद स्मारकाला त्यांनी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हुतात्मा बालाजी रायपूरकर यांना पुष्पचक्र अर्पण केले. या परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यालाही त्यांनी अभिवादन केले.
स्मारकावर अभिवादन केल्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी चिमूर क्रांती लढयाने या परिसरातच नव्हे तर तमाम देशासाठी स्वातंत्र्यांचे स्फुल्लिंग चेतविल्याचे सांगितले.चिमूर येथे शहीद स्मारक परिसरात आगमन झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या भारलेल्या वातावरणाची, बलिदानाची,त्यागाची, महती कळते. राष्ट्रसंत तुकडोजीच्या खंजिरीतून निर्माण झालेल्या क्रांतीचे महत्त्व याभूमीत अधोरेखीत होते. चिमूरच्या भूमीमध्ये आल्यावर प्रत्येकाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याचे बळ प्राप्त होते. त्यामुळे शहिदांच्या पावन स्मृतीत नतमस्तक होण्यासाठी आलो.
कोरोना संकट काळामुळे याठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले नाही. तरीही या भुमीकडे 16 ऑगस्टला राष्ट्रप्रेमी नागरिकांचे पाय वळतेच. त्यामुळे आज या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार उपस्थित होत्या. तसेच नगराध्यक्ष गोपाल झाडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ,तहसिलदार संजय नागतिलक,मुख्याधिकारी मंगेश खवले ,
जि.प सदस्य ममता डुकरे, गजानन बुटके, पं.स. सभापती लता पिसे,चित्राताई डांगे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी परिसरातील नगर परिषदेला भेट दिली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयात कोरोना संसर्ग उपाययोजनाचा आढावा घेतला.