गडचिरोली आंतर-जिल्हा एसटी वाहतूक नियंत्रित स्वरुपात सुरु, येणाऱ्यांना गृहविलगीकरण आवश्यक - जिल्हाधिकारी दीपक सिंगला, प्रवासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना

गडचिरोली आंतर-जिल्हा एसटी वाहतूक नियंत्रित स्वरुपात सुरु, येणाऱ्यांना गृहविलगीकरण आवश्यक - जिल्हाधिकारी दीपक सिंगला

प्रवासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना

गडचिरोली,(जिमाका) दि.20 : जिल्हयातील कोरोनास्थिती नियंत्रणात रहावी व बाहेरून आलेल्यांच्या संपर्कात स्थानिक नागरिक येवू नयेत म्हणून एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर खबरदारी व गृह विलगीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मार्गदर्शक सूचना आज निर्गमित केल्या. एसटीसाठी कमाल प्रवास धारण क्षमतेच्या 50 % प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अखत्यारीतील 50 % बस डेपो प्रवासी वाहतुक करण्याची परवानगीही यावेळी देण्यात आली आहे.  नजीकच्या अंतरावरील बसेस तुर्तास सुरु करण्यात येऊन लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरु करण्यात येऊ नयेत अशे आदेश देण्यात आले आहेत.   बसेसमध्ये सामाजिक अंतराच्या मर्यादेत कमाल केवळ 22 प्रवाशांना प्रवासाची अनुमती असेल, याहून अधिक प्रवासी आढळल्यास संबंधित आगारप्रमुख यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.   बसेसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध ठेवणे, तसेच प्रवासानंतर बसेस नियमितपणे सॅनिटाईज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनचालक, वाहक व प्रवासी यांनी मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.  मास्क वा चेहऱ्यावर रुमाल असल्याशिवाय कोणत्याही प्रवाश्याला बसमध्ये प्रवेश देऊ नये. तसेच प्रत्येक प्रवाशाने आधार वा इतर कोणतेही ओळखपत्र स्वत:जवळ बाळगणे अनिवार्य असेल याबाबत तपासणीची जबाबदारी महामंडळावर देण्यात आली आहे.

       गडचिरोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या व परत येणाऱ्या प्रत्येक बसेसमधील प्रवाशांचे तपशील व हमीपत्र विहीत प्रपत्रात गोळा करण्याची जबाबदारी बसवाहक यांना देण्यात आली आहे. याकरिता आवश्यक हमीपत्र, बसेसमध्ये पेन/पेन्सिल इत्यादी पुरवठा करण्याची जबाबदारी विभाग नियंत्रक, एमएसआरटीसी यांची असणार आहे. बाहेर जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या व परत येणाऱ्या प्रत्येक बसेसमधील प्रवाशांचे तपशील/हमीपत्र विहीत प्रपत्रात गोळा करण्यासंदर्भात आवश्यक मनुष्यबळ गडचिरोली जिल्ह्याचे आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्ट, नाक्यावर पुरविण्याची जबाबदारी ही विभाग नियंत्रक, एमएसआरटीसी, गडचिरोली यांची असणार आहे. एका मार्गावर ठराविक शिफ्टमध्ये वाहनचालक व वाहक यांची ड्युटी 7 दिवसाकरिता निर्धारित करण्यात आली आहे तदनंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात करण्यात येणार आहे. 

      प्रत्येक प्रवाशाला गडचिराली जिल्हाक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर प्रवासानंतर 14 दिवसाकरिता गृह विलगीकरणात (होम क्वारांटाईन) राहणे बंधनकारक असेल. सदर व्यक्तींनी कोविड-19 अंतर्गत विलगीकरणाचे पालन योग्यप्रकारे करावे. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी स्थानिक शासकीय रुग्णालयांमधून तालुका आरोग्य अधिकारी यांचे माध्यमातून करण्यात यावे.

 तथापी जे प्रवाशी कोरोना साथरोगसंदर्भाने रेड झोन/हॉटस्पॉट्स मधून प्रवास करुन येत असतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.

         याकरिता आवश्यक कार्यवाही संबंधित तहसिलदार करतील.  प्रति दिवस प्रवासाचे इत्यंभूत तपशील (आगार निहाय/बसनिहाय) विहीत प्रपत्रात दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्रित केले जाणार आहेत. 

        महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेस व्यतिरिक्त  सर्व व्यक्तींची आंतरराज्य/राज्यांतर्गत (आंतर-जिल्हा) होणाऱ्या हालचाली विना परवाना बंद राहतील.  परराज्यात/राज्यांतर्गत (गडचिरोली जिल्ह्यातुन इतर जिल्ह्यात) प्रवासाकरीता https://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा.  
       गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत प्रवासाला कोणत्याही पासची गरज नाही.  गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातुन वा बाहेर जिल्ह्यातुन विना परवाना प्रवेश करता येणार नाही. याकरिता दंडाची तरतूद यापूर्वीच्या आदेशानुसार सुरु राहील. गडचिरोली जिल्ह्याबाहेरुन सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेवून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तिंना आरोग्य विभाग यांचेकडून दिलेल्या निर्देशानुसार विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.