वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिका-यांकडून पाहणी, बामणी – राजुरा पूल व शिवनी चोर पूरग्रस्त भागाला भेट District Collector inspects flood level of Wardha river, Visit to flood affected areas of Bamani – Rajura bridge and Shivni Chor

🔶 वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

🔶 बामणी – राजुरा पूल व शिवनी चोर पूरग्रस्त भागाला भेट

#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 20 : चंद्रपुर जिल्ह्यात गत दोन – तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुधडी भरून वाहत आहे. त्यातच इसापूर, पूस आणि लोअर वर्धा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बसला असून या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.20) बामणी – राजूरा पुलाची तसेच शिवनी चोर (ता. चंद्रपूर) येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. 
बामणी – राजूरा पुलावरील वाहतूक मंगळवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून पाण्याची पातळी पुलाच्या खाली गेली असली तरी मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रतिबंध करावा. पुलाच्या दोन्ही बाजुला पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. पाणी पातळी कमी झाल्यावरच वाहतूक सुरू करावी. कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही, याची यंत्रणेने काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, बल्लारपूरचे नायब तहसीलदार श्री. साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी, पोलिस निरीक्षक विपीन इंगळे आदी उपस्थित होते. 
शिवनी चोर परिसराला भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील शिवनी चोर परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. वर्धा नदीच्या बॅक वॉटरमुळे येथील परिसरातील पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आली आहेत. पूर ओसरल्यावर नुकसानग्रस्त शेतमालाचे पंचनामे अचूक पध्दतीने करावे. त्यासाठी उपविभागीय अधिका-यांनी योग्य नियोजन करावे. पंचनामे करण्यात आलेल्या शेतीची व शेतक-यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी. तसेच पंचनामे करतांना संबंधित मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदवावा, जेणेकरून नुकसान भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही. 
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तलाठी दिनेश काकडे, शिवनी चोरचे सरपंच रविंद्र पहानपट्टे आदी उपस्थित होते.