‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, चंद्रपूर जिल्हाभरात आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी एकूण 1967 चमू कार्यरत #MajheKutumbMajhiJababdari

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

चंद्रपूर जिल्हाभरात आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी एकूण 1967 चमू कार्यरत

चंद्रपूर दि.26 सप्टेंबर:  कोरोनावर मात करण्यासाठी  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.  ही मोहिम आरोग्याची  चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर विभागातील जिल्ह्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.   
 केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढे राहील, असे प्रयत्न सर्वांना मिळून करायचे आहेत. स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची. गर्दीच्या ठिकाणी कसे वर्तन करायचे या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवायच्या आहेत.

स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाचे संरक्षण  हा  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेचा उद्देश आहे.  ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रॅपिड अँटिजेंन टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल, आणि लक्षण असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे.  होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना आपण घरी जाऊ देतो. पण लक्षणे न दिसणारी अशी मंडळी बाहेर फिरू लागतात आणि त्यांच्यामुळे अन्य काहींपर्यंत विषाणू पोहचू लागला आहे.

आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. . तसेच आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे.  

 आपल्याकडे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. या मोहिमचा उद्देश स्वरक्षणाचा आहे. मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा या मोहिमेचा गाभा आहे. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टर सोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधं उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्क फोर्सशी संपर्क साधावा. 

यातून राज्यातील मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी काय करता येतील, ते सर्व प्रय़त्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
 माझें कुटुंब माझी जबाबदारी मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल, असा विश्वास आहे. यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण यातून घेणार आहोत. लहानपणी आपल्याला आई-वडील बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुवा, स्वच्छतेची काळजी घ्या अशा सवयी लावत. त्यामुळे आता या सूचना ग्रामीण भागापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे.  लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे हे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीवन शैलीतील बदल स्विकारावे लागतील. असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे व उपाय योजनाची विस्तृत माहिती दिली. यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्हाभरात आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी एकूण 1967 चमू कार्यरत असून सर्वांना प्रशिक्षण व आरोग्य तपासणी कीट देण्यात आली आहे. गावातील सर्व सरपंच,प.स. सभापती, जि. प. सदस्य, तसेच त्या-त्या विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने गावागावात घरोघरी भेट देऊन आरोग्य तपासणी मोहीम व जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यासोबतच जिल्हा प्रशासनाकडून मेगा फोन, जिंगल्स तसेच जनजागृतीपर संदेश देणाऱ्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना जनजागृतीचे महत्व पटवून देण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडून चित्रकला व निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात 1000 बेड वाढविण्यात येत असून पुढच्या दहा ते बारा दिवसात जिल्ह्यात बेडची कमतरता भासणार नाही यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. असे ते म्हणाले. त्यासोबतच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी सुरू आहे. तसेच जिल्ह्यात होर्डीग फ्लेक्स व बॅनर च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे असेही ते यावेळी म्हणाले.

नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करा – या आधीचे सणवार आपण साधेपणाने साजरे केले आहेत. गणेशोत्सवही आपण साधेपणाने साजरा करण्यात यशस्वी झालो. आता आपल्याला येणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांनी  सहा  जिल्हयातील जिल्हाधिकांऱ्यांशी  संवाद साधून  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला.  कौतुक केले. या मोहिमेचा महत्त्वाचा सिम्बॉल जनजागृती करताना वापरण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड,जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.एस.एन. मोरे उपस्थित होते.