चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याबाबत हालचालींना पुन्हा एकदा वेग आलाय. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी करणारे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा या मागणीसाठी सक्रीय झाले आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी या मागणीला विरोध करत चंद्रपुरातली दारू तस्करी राजकीय संरक्षणात सुरु असल्याचा गंभीर आरोप केलाय.
चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दारूबंदीबाबत आज बुधवारी 30 सेप्टेंबर रोजी मुंबईत बैठक झाली. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आग्रहास्तव ही बैठक बोलावली होती. 5 वर्षात दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूची विक्री वाढली, बनावट दारूने मृत्यू ओढवल्याची आणि दारुबंदी काळात गुन्हेगारीत वाढ झाल्याची खुद्द पालकमंत्र्यांनी कबुली दिली. या सर्वांवर उपाय म्हणून त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना 27 ऑगस्टला पत्र लिहून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे आजवर चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याचीच मागणी होत असताना वडेट्टीवार यांनी त्यात राजकीय चातुर्याने गडचिरोलीचाही उल्लेख केला.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदीचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचं काय होणार यावर महाआघाडी सरकार येताच मोठी चर्चा सुरु झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचे फायदे आणि तोटे याचा अभ्यास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समीक्षा समितीने 16 मार्च 2020 ला पालकमंत्र्यांना दारूबंदी समीक्षा समितीचा अहवाल सादर केला आणि दारूबंदी विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या. पण अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाने या साऱ्या प्रक्रियेला ब्रेक लावला. पण आता दारूबंदी उठवण्याची मोहीम पुन्हा एकदा वडेट्टीवार यांच्या अजेंड्यावर आली आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी या मागणी ला विरोध करत चंद्रपुरातली दारू तस्करी राजकीय संरक्षणात सुरु असल्याचा गंभीर आरोप केलाय. सोबतच मुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा इतिहास हा फक्त 5 वर्ष जुना नाही तर गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी लागू आहे. पण या ठिकाणी देखील तेलंगणा आणि छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होते. प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या माध्यमातून कुठूनही दारूची तस्करी करता येते. सोबतच नक्षल समस्येमुळे पोलिस दारू तस्करीसाठी नाकाबंदी किंवा गस्त घाल्यासारखे उपाय देखील करू शकत नाही.
सरकार आणि सामाजिक कार्यकर्ते दारूबंदीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी चंद्रपूर आणि गडचिरोलीतील सामान्य लोकांना मात्र दारूबंदी नकोशी झाल्याचंच चित्र आहे. व्यापारावर झालेला विपरीत परिणाम, पर्यायी अंमली पदार्थांचा वाढता वापर आणि मोठा आर्थिक फायदा असल्यामुळे दारु तस्करीत उतरलेली तरुण मुलं या सारखी अनेक कारणं दारूबंदीच्या माथी मारली जात आहे.
पारोमिता गोस्वामी यांनी दारूबंदी कायम राहावी यासाठी आग्रह धरलाय. मात्र दारूबंदीमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चुकवावी लागलेली राजकीय किंमत आणि कोरोना नंतरची बदलेली आर्थिक परिस्थिती यामुळे दारूबंदी समर्थकांचा आवाज क्षीण झालाय. त्यामुळेच दारूबंदी हटवण्याबाबत वडेट्टीवार यांनी चंद्रपूरसोबत गडचिरोलीचा उल्लेख करून परफेक्ट टाईमिंग साधलंय, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.