चैतन्य चोरे ह्यांची विचित्र कार्यशैली - फौजफाटा घेऊन कार्यालयात धडक, ओळखपत्र किंवा परिचय हवा असल्यास जिल्हाधिकारी किंवा मनपा आयुक्तांना विचारा असे उत्तर Cmc employee faujfata

चैतन्य चोरे ह्यांची विचित्र कार्यशैली - फौजफाटा घेऊन कार्यालयात धडक

ओळखपत्र किंवा परिचय हवा असल्यास जिल्हाधिकारी किंवा मनपा आयुक्तांना विचारा असे उत्तर 

 चंद्रपूर,24 सेप्टेंबर(का प्र): जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांनी मास्क बाबत आदेश देताच चंद्रपूर मनपा अ‍ॅक्शन मोड वर आली असुन ह्या आदेशाला निधी प्राप्त करण्याची संधी समजुन तत्काळ वसुली मोहिम सुरू करण्यात आली आहे. मनपाने ह्यासाठी काही अधिकाऱ्यांची चमू तयार केली असून त्यांच्या समवेत 7 ते 8 कर्मचारी व सुरक्षा रक्षक देण्यात आले आहे. वस्तुतः महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत नागरिकांना अवगत करणे आवश्यक असतानाही महापालिकेने असे काहीही केले नाही आणि थेट कारवाई सुरू केली आहे.

ह्यापैकी एक अधिकारी चैतन्य चोरे आपला फौजफाटा घेऊन काल बस स्थानक परिसरात मोहिमेवर निघाले. त्यांनी बस स्थानकासमोर असलेल्या महसुल भवनावर आपला मोर्चा वळवला आणि थेट वृत्तपत्रीय जिल्हा कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी त्या इमारतीमध्ये असलेल्या एका दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधीला मास्क नाही म्हणुन 200 रुपयांचा दंड ठोठावला.

त्या जिल्हा प्रतिनिधींनी त्यांना परिचय विचारला असता चैतन्य चोरे ह्यांनी आपला परिचय देण्यास नकार दिला तसेच तुम्हाला माझा परिचय हवा असल्यास जिल्हाधिकारी किंवा मनपा आयुक्तांना विचारा असा दम दिला आणि अरेरावीची भाषा वापरली. ह्यावेळी मनपाने जारी केलेले कार्यालयीन ओळखपत्र देखील त्यांनी आपल्या शर्टच्या खिशात ठेवले होते.

बरीच विचारणार केल्यानंतर शेवटी त्यांनी आपले नाव सांगितले. वस्तुतः कारवाई साठी गेलेल्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याने नागरिकांनी विचारणार केल्यास आपला परिचय देणे अत्यावश्यक असुन अशी अरेरावी करणार्‍या करणार्‍या अधिकाऱ्याला मनपाने समज देणे गरजेचे आहे.

जर कर्मचारी आपला परिचय लपवत असेल आणि ह्यामुळे जर कुणी ह्याच प्रकारे महापालिका कर्मचारी आहे असे भासवून अवैध वसुली सुरू करून जनतेची फसवणूक केल्यास त्याची जबाबदारी महापालिका घेणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कार्यालये किंवा लोकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे महापालिकेला अधिकार आहेत का? ह्याबाबतीत महापालिकेने स्पष्ट करावे अशी मागणी जनतेने केली असुन महापालिकेत अभियंता असलेल्या असभ्य वर्तणूक असलेल्या चैतन्य चोरे ह्यांच्या अरेरावीला आयुक्तांनी आळा घालावा त्यासाठी वाटल्यास त्यांना प्रशिक्षण द्यावे अन्यथा अशा अधिकार्‍यांना जनता धडा शिकवण्यास मागेपुढे बघणार नाही हे खचितच.