लावणार : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर,दि. 5 (जिमाका ): लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोक प्रतिनिधीं आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे आणि लोक बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग आणखी वाढणार आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी 15 दिवसाचा लॉकडाऊन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी केंद्र शासनाकडे परवानगी मागितली आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे.मात्र तोपर्यंत लोक प्रतिनिधी आणि व्यापारी संघटना यांच्याशी जनता कर्फ्यु घेण्यासंदर्भात चर्चा करून सर्वांची संमती झाली की सुरू करण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
यापुढे मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 1 लाख मास्क खरेदी करून पोलिसांना देणार आणि मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला दंडासहित मास्क देण्यात येईल असेही ते म्हणाले.
लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे. मुंबई, पुण्याकडे आता संसर्गाची लाट कमी झाली आहे. आपल्याकडे उशिरा संसर्गाला सुरुवात झाली त्यामुळे लोकांमध्ये आपल्याला काही होत नाही असा भ्रम निर्माण झाला आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, वारंवार हात धुण्याच्या सवयीचा लोकांनी अवलंबणे आता गरजेचे झाले आहे असेही ना. वडेट्टीवार यावेळी म्हणाले.