खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण ; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण #kharra #Corona #Covid-19

खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण ; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या जेवढी वाढते. त्याच्या कितीतरी अधिक पटीने चंद्रपूर शहरात संख्या वाढत आहे. त्यासाठी मास्क , सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र ,चंद्रपूर जिल्ह्यातील, शहरातील युवावर्गातील खर्राचे व्यसनही कोरोनाच्या संक्रमणाचे कारण ठरत आहे .

  भीतीमुळे तपासणीला उशीर केल्याने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे

 सामान्यत : भीतीमुळे तपासणीला उशीर केल्याने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मई महिन्यात 2 मई ला चंद्रपूर जिल्ह्यात (चंद्रपूर शहरात) पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. पण , लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढून सात हजारांवर पोहोचलेली आहे . कोरोनाचे संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण लोकांमध्ये मास्क वापरण्याबाबत असलेला गैरसमज आहे .मास्कमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते .या गैरसमजामुळे अनेक जण रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणीसुद्धा मास्क लावणे टाळून संसर्ग वाढतो . काही तरुण आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा होणार नाही अशी समजूत करून रोग पसरवण्याचे माध्यम ठरतात .

गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही

गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही . खर्रा खाणाऱ्या शौकिनांची गर्दी पानटपरीवर नेहमी दिसते . चंद्रपूर  जिल्ह्यात खर्रा , गुटखा, पान खाणाऱ्याचे प्रमाण भरपूर आहे .असे शौकीन खर्रा,पान रस्त्यांनी धुंकत फिरतात. विशेष म्हणजे खर्राचे आदानप्रदान करताना हात न धुणे , सामाजिक अंतर याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आजूबाजूचे निरोगी लोकांपर्यंत कोरोनाची लागण होणे शक्य आहे. तसेच आपल्याला ताप आल्याचे डॉक्टरला सांगितले तर उपचारापोटी लुबाडणूक करतील , या कल्पनेने अनेक जण आजार अंगावर काढत आहेत. वातावरण बदलामुळे झालेली सर्दी व ताप आहे, असेही समजूत समाजात वावरत आहेत . त्यामुळे निरोगी माणसांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार अधिक होत आहे.

 भीतीमुळे टाळाटाळ 

सोशल मिडीयावरून कोरोनाच्या बाबतीत वेगळेच चित्र रंगवले जाते. रुग्णालयात आपली काळजी घेतली जाणार नाही. आपल्याला कुटुंबीयांना भेटता येणार नाही. एकट्यालाच रहावे लागेल आदी अनेक कारणांमुळे टाळाटाळ होते. प्राथमिक स्तरावर तपासणीसाठी सहसा कोणी समोर येत नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. काही कोरोनाबाधित घरी विलगीकरणात असताना नियमांचे पालन करत नाही. यामुळे कुटुंबीयांना व इतरांना कोरोनाची बाधा पोहोचवतात. तेव्हा आपण सर्वांनी नियम पाळूनच कोरोनाला हरवता येणे शक्य आहे.

रोज रस्त्यांचे निर्जंतुकीकरण होणे गरजेचे 

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या " न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन " या पत्रकानुसार कोरोना विषाणू हवेत व वेगवेगळ्या पृष्ठभागावर जास्तीत जास्त तीन दिवसापर्यंत सक्रिय असतो. या कालावधीत तो जर निरोगी माणसाच्या संपर्कात आला तर , त्या व्यक्तीला कोविड -19 हा आजार होऊ शकतो. तो तीन दिवसांच्या आत माणसाच्या संपर्कात आला नाही तर , निष्क्रिय होतो. हे टाळण्यासाठी प्रशासनाद्वारे रोज रस्त्यांचे निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यसनी कोरोनाबाधित लोकांनी खर्रा खाऊन उडवलेल्या धुंकीतील विषाणू निष्क्रिय होतील.