विशेष वृत्त
माझे कुटूंब माझी जबाबदारी,
पहिल्या टप्प्यात 21 लाख 53 हजार 473 नागरिकांची तपासणी,
5 लाख 17 हजार 950 गृहभेटी ;
2275 संशयीतांपैकी 254 कोरोना बाधित
चंद्रपुर, दि. 21 ऑक्टोबर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याने 22 लाख 46 हजार लोकसंख्येपैकी 21 लाख 53 हजार 473 नागरिकांची तपासणी करून 97.19 टक्के उद्दिष्ट पुर्ण केले आहे.
कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हि मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर येथे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता.
या मोहिमे अंतर्गत आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, शिक्षक,अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामपंचायतींनी सहकार्य केले.एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने जिल्ह्यातील 5 लाख 32 हजार 901 घरांपैकी 5 लाख 17 हजार 950 घरी भेट देवून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, बल्लारपुर व राजुरा या शहरी भागात 117 आरोग्य पथके, ग्रामीण भागात 1 हजार 981 पथके तर चंद्रपूर महानगरपालीकेच्या हद्दीत 111 असे एकूण 2 हजार 209 आरोग्य तपासणी पथके नेमण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात सारी, आयएलआयचे 2 हजार 275 संशयीत आढळून आले होते. तेव्हा खबरदारी म्हणून त्यांचेसह एकूण 2 हजार 731 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यातील 254 जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले. या बाधीतांचा वेळीच उपचार करण्यात आल्याने कोरोना श्रृंखला तोडण्याचे व मृत्यू दर कमी करण्याची या अभियानामागची शासनाची संकल्पना पुर्णत्वास येत आहे.
जिल्ह्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात आतापर्यंत 8 लाख 56 हजार 336 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 620 संशयीतांपैकी 91 कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या बांधीतांवर वेळीच उपचार करण्यात येत आहेत.
बरेचशे रुग्ण अंतिम क्षणी रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी पाहिजे तसा कालावधी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी आपले आजार न लपवीता आरोग्य पथकाला सहकार्य करावे व कोरोनापासूनचा संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.