महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी लढावे, दारूबंदीशी नाही : महाराष्ट्रभुषण डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग, कोरोनापेक्षा दारूबंदी ही मोठी आपत्ती वाटते का ? असा प्रश्न बंग दाम्पत्याने विचारले, जिल्ह्यातील जनआंदोलन करून मिळवलेली दारूबंदी महाराष्ट्र शासनाने उठवू नये #DaruBandiUthavuNaye #Gadchiroli #DrAbhayBang #DrRaniBang

महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी लढावे,  दारूबंदीशी नाही : महाराष्ट्रभुषण डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग

कोरोनापेक्षा दारूबंदी ही मोठी आपत्ती वाटते का ? असा प्रश्न बंग दाम्पत्याने विचारले

जिल्ह्यातील जनआंदोलन करून मिळवलेली दारूबंदी महाराष्ट्र शासनाने उठवू नये


गडचिरोली ,10 ऑक्टोबर : जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी लढावे, दारूबंदीशी लढू नये, असे आवाहन महाराष्ट्रभूषण डॉ.  अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , राज्यपाल कोश्यारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केले आहे.

जिल्ह्यातील जनआंदोलन करून मिळवलेली दारूबंदी महाराष्ट्र शासनाने उठवू नये

 यासंदर्भात सर्च (Search) संस्थेद्वारे दिलेल्या पत्रकात बंग दाम्पत्याने म्हटले आहे की , केंद्र शासनाची व राज्य शासनाची " आदिवासी मद्यनीती ' ही आदिवासी भागात दारू दुकाने व विक्रीला मनाई करते. 1987 ते 1993 अशी सहा वर्षे जिल्ह्यात व्यापक सर्वपक्षीय जनआंदोलनाने व 600 गाव , 334 संघटना व तिन्ही आदिवासी आमदारांनी मागणी केल्यानंतर 1993 मध्ये जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. गेली 27 वर्षे इथे दारूबंदी आहे. 

सन 2016 पासून इथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हाव्यापी दारू - तंबाखूमुक्ती अभियान मुक्तिपथ सुरू आहे.

  गडचिरोली जिल्ह्यात दारू सुरू केल्यास स्त्रियांवरील अत्याचार दुप्पट होतील.  

पंचायतराज घटना दुरुस्ती व पेसा कायदा यानुसार व महाराष्ट्रातील महिला धोरणानुसार आदिवासी ग्रामसभा , महिला ग्रामसभा व ग्रामपंचायतींना दारू नियमन करण्याचे अधिकार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांनी दारूबंदीसाठी प्रस्ताव पारित केले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने जिल्ह्यात दारूबंदी लागू केली आहे. ती अजून प्रभावी कशी करावी , हा विचार करावा. ती उठविण्याचा प्रयत्न बेकायदेशीर आहे. दारू व तंबाखूमुळे कोरोनाचा प्रसार वाढतो. म्हणून या महामारीच्या नियंत्रणासाठी दारू विक्री व तंबाखू सेवन बंद करावे , अशा सूचना आरोग्य मंत्रालय, भारत सरकार व आय .सी .एम . आर .(ICMR) यांच्या आहेत .

कोरोनापेक्षा दारूबंदी ही मोठी आपत्ती वाटते का ? गडचिरोलीमध्ये कोरोना वेगाने पसरतो आहे. अशावेळी कोरोना नियंत्रणाऐवजी दारूबंदी उठविण्याचा विचार घातक आहे. शासनाला कोरोनापेक्षा दारूबंदी ही मोठी आपत्ती वाटते का , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , काँग्रेस अध्यक्ष , राज्यपाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार काय भूमिका घेणार , असा प्रश्नही बंग दाम्पत्याने विचारला आहे .