नागपूर : नागपूर शहराने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव लौकीक करणारे अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, मुष्टीयोद्धा, शरीरसौष्ठव, जलतरण, सायकलिंग अशा अनेक प्रकारच्या खेळांमध्ये नागपुरातील खेळाडूंनी यश संपादन केले आहेत. मोठ्या स्तरावर जाउन यश संपादन करणारे हे खेळाडू शहरातील गल्लीबोळात राहणा-या, मैदानात खेळणा-या अनेकांसाठी आदर्श आहेत.
शहरातील तरुणांमध्ये, मुलांमध्ये अनेक कौशल्य आहेत. त्याला योग्य व्यासपीठ मिळाल्यास देशाचा मान उंचावणारे आणखी व्यक्ती तयार होतील. याच विश्वासाच्या भावनेतून नागपूर शहरामध्ये ‘खासदार क्रीडा महोत्सव’ साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरासह आसपासच्या भागातील अनेक उदयोन्मुख, प्रतिभावंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील देशात आदर्श ठरलेला हा महोत्सव यशस्वी करण्यात संदीप जोशी यांचे महत्वाचे योगदान ठरले. नागपूर शहरात दोनदा आयोजित झालेल्या संपूर्ण खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक म्हणून संदीप जोशी यांनी ना.नितीन गडकरींनी सोपवलेली जबाबदारी लिलया पेलली. प्रत्येक खेळाडूला त्याने निवडलेल्या स्पर्धेत सहभागी होता यावे, त्यासाठी त्याला आवश्यक साहित्य, अन्न पुरविणे यापासून ते क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील ओस पडलेली मैदाने क्रीडांगणे म्हणून नावारूपास येणे इथपर्यंत ना.नितीन गडकरी यांचा दुरदृष्टीकोन होता. तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखविण्यात संदीप जोशी यांची मोठी भूमिका ठरली.
पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आणि यशानंतर अगदी सहा महिन्यातच दुसरे खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले. हा महोत्सव संपूर्ण देशात गाजला. भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनीही त्याची प्रसंशा केली. दोन्ही क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाटा संदीप जोशींचा असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संदीप जोशी यांचे कौतुक केले.