ग्रामपंचायतीला 55.48 लक्ष रुपयांची थकीत करवसुली
चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 573 प्रकरणे आपसी तडजोडीने निकालात निघाली असून यामध्ये रुपये तीन कोटी 39 लाख 99 हजार 102 मुल्याच्या वादांबाबत तडजोड झाली आहे.
आपसी तडजोडीने वाद मिटविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये दि. 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात न्यायालयात येण्याअगोदरीची प्रकरणे, विविध बँका, विमा कंपनी, विद्युत वितरण कंपनी, बीएसएनएल कंपनी, तसेच विविध पक्षकारांनी आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्यासाठी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित 225 प्रकरणे आणि दखलपुर्व 348 असे एकूण 573 प्रकरणे निकाली काढण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कवीता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीधर मौदेकर व के.पी.श्रीखंडे, दिवाणी न्यायाधीश एम.ए.शिलार, एम.एस.काळे, कामगार न्यायालयाच्या न्या.एस.झेड. खान आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस.कुळकर्णी व एस.आर.जाधव यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
लोकन्यायालयातून ग्रामपंचायतीला 55.48 लक्ष रुपयांची थकीत करवसुली
राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतीमधील 1441 प्रकरणात रुपये 26.31 लक्ष वसुली करण्यात आली असून 1091 प्रकरणातील थकीत करधारकांनी 29.17 लक्ष रुपये चार दिवसात ग्रामपंचायतीकडे जमा करण्याबाबत तडजोडनाम्यात लिहून दिले आहे.
लोकन्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात थकीत कराचा भरणा झाल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यातून अनेक विकास कामास चालना मिळून ग्रामस्थांकरिता गावात मुलभूत सुविधा निर्माण होतील.
तरी प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींनी अशाप्रकारे आपसी तडजोडीने प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकरी (ग्रामपंचायत) कपीलनाथ कलोडे यांनी कळविले आहे.