चंद्रपूर जिल्‍हयातील विमानतळ उभारणीसाठी आवश्‍यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी – आ. सुधीर मुनगंटीवार मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक संपन्‍न #ChandrapurAirport #SudhirMungantiwar

चंद्रपूर जिल्‍हयातील विमानतळ उभारणीसाठी आवश्‍यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी – आ. सुधीर मुनगंटीवार
 
मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक संपन्‍न
 
चंद्रपूर जिल्‍हयातील राजुरा तालुक्‍यातील विहीरगांव आणि मुर्ती येथे प्रस्‍तावित असलेल्‍या विमानतळ उभारणीसाठी वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रलंबित असलेला प्रस्‍ताव मंजूर करून केंद्र शासनाला पाठवावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सदर विमानतळ उभारणीच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्‍याच्‍या सुचना मुख्‍य सचिव संजय कुमार यांनी संबंधितांना दिल्‍या.
 
आज मंत्रालयात मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली चंद्रपूर जिल्‍हयातील प्रस्‍तावित ग्रीडफिल्‍ड विमानतळाबाबत बैठक संपन्‍न झाली. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विमानतळ उभारणीची कार्यवाही जलदगतीने करण्‍याची मागणी केली. प्रस्‍तावित विमानतळाकरिता वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव नियमानुसार शासनाला सादर झालेला आहे. वनजमिनीच्‍या बदल्‍यात देयात येणा-या सी.ए. जमिनीची खरेदी करण्‍याची कार्यवाही 70 टक्‍के पूर्ण झालेली आहे. खाजगी जमिनीची 116.48 हे आर जमिनीपैकी 95.35 हे.आर जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली असून 7/12 वर फेरुार घेण्‍यात आले आहेत व उर्वरित जागेची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. प्रस्‍तावित विमानतळ निर्धारित वेळेत तयार झाल्‍यास चंद्रपूर व गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासाला गती मिळेल. कापसावर आधारीत उद्योग तसेच अन्‍य उद्योग या ठिकाणी येतील व त्‍या माध्‍यमातुन रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होतील. ही बाब लक्षात घेता सदर विमानतळ उभारणीची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्‍याची भूमीका आ. मुनगंटीवार यांनी मांडली.
 
सदर विमानतळ उभारणीच्‍या दृष्‍टीने वनजमिनीच्‍या हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव केंद्र शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्‍याच्‍या दृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करावी तसेच अन्‍य आवश्‍यक बाबींबाबत सुध्‍दा कार्यवाही करण्‍याचे निर्देश मुख्‍य सचिव संजय कुमार यांनी संबंधितांना दिले.