सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची फसवणूक , आरोपीला अटक CJ Bobade

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची फसवणूक , आरोपीला अटक

नागपूर, 09 दिसम्बर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली . सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भातील प्रकरण दाखल करून गुन्हेगाराला अटक केली . प्रकरण संवेदनशील असल्याने आतापर्यंत पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते . पण आज दुपारी याप्रकरणातील एक आरोपी तापस घोष याला अटक करण्यात आल्याची माहिती झोन क्रमांक दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी दिली .

पोलिस उपायुक्त शाहू यांनी दिलेल्या माहितीनुसार , बोबडे कुटुंबीयांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपती आहे . त्यावर सीझन लॉन तयार केलेले आहे . मागील सुमारे १० वर्षापूर्वी तापस घोष याला हे लॉन चालविण्यासाठी दिले होते . यापासून मिळणाऱ्या किरायाच्या पैशांचा हिशेब तापस घोष आणि त्याची पत्नी ठेवायचे . या लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्या नावे आहे . त्या बऱ्याच वयोवृद्ध आणि आजारी आहेत . घोष दाम्पत्याने मुक्ता बोबडे यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन लॉनच्या किरायापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेत हेराफेरी केली . त्यांनी बनावट पावत्या तयार करून रक्कम हडपली .

२०१६ पासून हा प्रकार सुरू होता . काही दिवसांपूर्वी ही फसवणूक बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आली . त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची तपासणी करण्यात आली . पोलिसांनी घोष दाम्पत्याची चौकशी केली असता जवळपास अडीच कोटी रुपयांचा गैरप्रकार केल्याची बाब पुढे आली . या आधारावरून मंगळवारी रात्री उशिरा सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली . आज दुपारनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही विनिता शाहू यांनी सांगितले .