चंद्रपूर : मोदी सरकार हे आमच्या नेत्यांना घाबरवत आहे. त्यामुळेच पोलिसांना पुढे करून राजकारण करीत आहेत. शेतकऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनु शकत नाही तसं हृदयही लागत असा टोला महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी लावला.
खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील २ कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या मा. राष्ट्रपती यांना देण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी आणि भाजप ज्या विचारसरणीतून येतात, त्या विचारसरणीची दडपशाहीची परंपरा आहे. मात्र आम्हीही अशा परंपरेचे वारसदार आहोत. जे असल्या दडपशाहीसमोर झुकणार नाही. जोपर्यंत मोदी सरकार हे काळे कृषी कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
मोदी सरकारकडून प्रत्येक ठिकाणी रोखलं जातं. इतर राज्यात जाऊ दिलं जात नाही. काँग्रेस खासदारांना कार्यालयातून बाहेर पडू दिलं जात नाही. हाथरसला गेलो की अटक केली जाते. मोदींनी हे समजून घ्यावं की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. जो कोणी नरेंद्र मोदींच्या विरोधात उभा राहतो त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. शेतकऱ्यांनी विरोध केला तर त्यांना देशद्रोही ठरवण्यात येतं. मजुरांनी विरोध केला तर त्यांनाही देशद्रोही ठरवण्यात येतं.
संपूर्ण देश पाहतोय की शेतकरी दुःखात, त्रासात आहे. मोदींना त्यांचे ऐकावेच लागेल. शेतकर्यांसमोर, मजुरांसमोर कुठल्याही ताकदीचा टिकाव नाही लागू शकत. जर का हे कायदे मागे घेतले नाही तर संपूर्ण देशाचं नुकसान होईल अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.