ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र पारंपारिक (Offline Mode) पध्दतीने स्वीकारणार #ग्रामपंचायतइलेक्शन

ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्वीकारणार
 
चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि.30 डिसेंबर 2020 पर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. मात्र दि. 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. 

सदर बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (offline mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वा. पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये भरुन घेण्यात यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले असल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी कळविले आहे.