सावित्री बनुन किमान एका स्रिला सुशिक्षीत करा- पालकमंत्री विजय वडेट्टीवार #चंद्रपुर #सावित्रीबाईफुले #जयंती


सावित्री बनुन किमान एका स्रिला सुशिक्षीत करा
- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 3 जानेवारी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या अंगावर शेण झेलत आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली, ताठ मानेने जगणे शिकविले, त्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षीत झालेल्या आजच्या स्रीने सावित्री बनुन किमान एका गरजवंत स्रिला सुशिक्षीत करण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिन समारोहनिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कर्तत्वाचा ठसा उमटविणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शंभर महिलांचा सत्कार आज पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्सव समिती, चंद्रपूर, यांच्यातर्फे पठाणपूरा येथील जोडदेऊळ देवस्थान सभागृहात वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, ज्येष्ठ समाजसेविका व लेखीका अरुणा सबने,  संदिप गड्डमवार, ॲड. दत्ता हजार, पुरूषोत्तम सातपुते, माजी आमदार देवराव भांडेकर, स्मिता रेभनकर, सुनिता लोढीया, चिंत्रा डांगे, अश्विनी खोब्रागडे, क्रांती दहीवडे, अलका जिझीलवार नम्रता ठेमस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की, प्रथम मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात भरविण्यात आली, त्या शाळेच्या दर्शनाने महिलांना प्रेरणा मिळेल व सकारात्मक बाबी करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण होईल. यासाठी शासनाचा मंत्री म्हणून पुणे येथील भिडे वाड्याच्या डागडुगीची जबाबदारी घेण्याचे व या ऐतिहासीक वास्तुचे जतन व संवर्धन करण्याबाबत कॅबीनेटपुढे प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 
समाजसेविका अरुणा सबने यांनी सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कशा प्रकारे मार्गक्रमण केले याबाबतची माहिती दिली व त्यांचा आदर्श बाळगून स्त्रियांनी सामाजिक विकासासाठी ठळक कार्ये हाती घेण्याचे सांगितले. अरुणा सबणे यांनी यावेळी शासनामार्फत भिडे वाड्याचे जतन करण्याबाबत पालकमंत्री वडेट्टीवार यांना विनंती केली.

महिलांनी रणरागिनी बनून प्रत्येक आवाहनाला उत्तर देण्यास सज्ज राहण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोकर यांनी केले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या सत्कारमुर्ती महिलांचे अभिनंदन केले. तर आमदार अभिजित वंजारी यांनी देखील सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तावकि नंदू नागरकर यांनी तर संचालन स्मिता रेभनकर यांनी केले.

कार्यक्रमाला सुर्यकांत खनके, प्रकाश देवतळे, राजु बनकर, श्याम धोपटे, विजय राऊत, अनिल शिंदे, अनुराधा हजारे, शालीन भगत, मंगला मडावी व आयोजन समितीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.