Corona Breaking News : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह #Covid-19

Corona Breaking News : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम : पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते. त्याच वेळी कोरोना संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

पोहरादेवी मंदिराच्या महंताच्या कुटुंबातील पाच जण, आणखी तिघे जण, असे एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाने 22 फेब्रुवारीला केलेल्या तपासणीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. संजय राठोड यांच्या पोहरादेवी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवार 22 फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर विरोधकांनी राठोडांवर टीकेची झोड उठवली. त्यावर आपण कोणालाही निमंत्रण दिले नव्हते, समर्थकांनीच गर्दी केली, असं म्हणत हात झटकले होते.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीच्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.