मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सूनबाईक खासदार रक्षा खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज दुपारच्या सुमारास समोर आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
“माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं एकनाथ खडसे ट्विटरवर म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे यांना सर्वात आधी 19 नोव्हेंबर 2020 रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत 6 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid-19 चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल”, असं एकनाथ खडसे ट्विटरवर म्हणाले होते. त्यानंतर उपचार घेऊन ते बरे झाले होते.
त्यानंतर 31 डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी प्रसिद्धीपत्रकही जारी केलं होतं. विशेष म्हणजे या कालावधीत त्यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी ईडीकडून तारीख वाढवण्याची मागणी केली होती. ती मागणी ईडीने मान्यही केली होती.