बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या प्रत्‍येक संकल्‍पनेच्‍या पूर्णपणे पाठीशी – आ. सुधीर मुनगंटीवार, बल्‍लारपूर नगर परिषदेतर्फे इमारतीचे भूमीपूजन संपन्‍न. #Ballarpur #बल्लारपुरनगरपरिषद #SudhirMungantiwar

बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या प्रत्‍येक संकल्‍पनेच्‍या पूर्णपणे पाठीशी – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर नगर परिषदेतर्फे इमारतीचे भूमीपूजन संपन्‍न.
 
चंद्रपुर/ बल्लारपुर : बल्‍लारपूर शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. १९९५ च्‍या विधानसभा निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान मी बल्‍लारपूर तालुका निर्मीतीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या व विश्‍वासाच्‍या बळावर ही प्रतिज्ञा मी पूर्ण केली. या शहराच्‍या विकासासाठी मी शर्थीचे प्रयत्‍न केले. बल्‍लारपूर नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन मंजूर विकास आराखडयातील आरक्षण क्रमांक ४१ शॉपींग सेंटर सर्वसमावेशक आरक्षण तत्‍वानुसार विकसित करून इमारत नगर परिषदेला हस्‍तांतरीत करण्‍याची अभिनव संकल्‍पना राबविण्‍यात आली आहे. या अभिनव संकल्‍पनेबद्दल नगराध्‍यक्ष हरीश शर्मा व त्‍यांच्‍या सर्व सहका-र्यांचे मी अभिनंदन करतो. हे शहर राज्‍यातील सर्वात विकसित शहर व्‍हावे यादृष्‍टीने राबविण्‍यात येणारी प्रत्‍येक संकल्‍पना साकार व्‍हावी यासाठी मी पूर्णपणे पाठीशी असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
दिनांक ३० मार्च रोजी बल्‍लारपूर नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन आयोजित इमारत बांधकामाच्‍या भूमीपूजन सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मंजूर विकास आराखडयातील आरक्षण क्रमांक ४१ शॉपींग सेंटर सर्वसमावेशक आरक्षण तत्‍वानुसार विकसित करून नगर परिषदेला हस्‍तांतरीत करावयाच्‍या इमारतीचा भूमीपूजन सोहळा संपन्‍न झाला. या सोहळयाला भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, उपाध्‍यक्षा सौ. मिना चौधरी, सौ. रेणुका दुधे, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, घनश्‍याम मुलचंदानी, अजय दुबे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, समीर केने, मनीष पांडे, निलेश खरबडे, आशिष देवतळे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, बल्‍लारपूर शहरात विकासकामांची दिर्घमालिका आम्‍ही तयार केली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम,  डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र,  सुसज्‍ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बस स्‍थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, छठपूजा घाट, मुख्‍य मार्गांचे सिमेंटीकरण, श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्‍याधुनिक भाजी मार्केट, ई-वाचनालये, चार बालोद्याने अशी विविध विकासकामे आम्‍ही पूर्णत्‍वास आणली. शहरानजिक देशातील अत्‍याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून सर्व आवश्‍यक क्रिडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रिडा संकुल देखील पूर्णत्‍वास आले आहे. विकासकामांच्‍या या दिर्घ मालिकेच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर शहर बदलत गेले आहे. या पुढील काळातही विकासाची ही मालिका अशीच अव्‍याहतपणे सुरू राहणार असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
 
कार्यक्रमाचे संचालन काशी सिंह यांनी केले तर नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी आभार व्‍यक्‍त केले. आ. सुधीर मुनगंटीवार यांची विकासाबद्दलची कल्‍पकता व तळमळ ही आमच्‍यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. यातुनच या शहराचा विकास साधला गेला असून भविष्‍यातही या शहराच्‍या विकासाचे ध्‍येय उराशी बाळगून आम्‍ही कार्यरत राहू, असेही हरीश शर्मा म्‍हणाले.