Maharashtra Corona Update : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर #Covid-19

Maharashtra Corona Update : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मोठा शहरांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कठोर निर्बंधाचे निर्णय घेतले जात आहे. प्रशासनानं निर्बंध घातले असले तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. 

राज्यात आज दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे. दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच 5 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात पुणे शहरातील रुग्णसंख्या 2 हजार 500 पेक्षा जास्त होती. तर पिंपरी-चिंचवड मध्ये जवळपास 1 हजार 200 रुग्ण सापडले होते. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना पाझिटिव्हिटीचा दर 25 टक्क्यांच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. रात्रीपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवारी एकाच दिवसांत 2 हजार 587 अशी उच्चांकी रुग्णसंख्या आढळून आली होती.

नागपुरात आज पुन्हा एकदा कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात तब्बल 3 हजार 796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात आज कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 277 रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्येचा आढावा घेतला तर 1लाख 82 हजार 552 रुग्ण आतापर्यंत आढळून आले. त्यातील 1लाख 54 हजार 410 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. तर आतापर्यंत 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.