कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक
-- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर दि. 7 फेब्रुवारी : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांचेसह सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल बल्लारपुर येथे व्यक्त केले.
‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काल बल्लारपूर व राजुरा विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. यावेळी बल्लारपुरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, पंचायत समिती सभापती इंदिरा पिपरे, बल्लारपुर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, नगरसेवक तसेच बल्लारपुर व राजुरा येथिल सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आपआपल्या क्षेत्रातील सर्व नागरीकांना स्वत:हून कोविडची तपासणी करुन घेणे, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे त्यासोबतच मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, लग्न व इतर सामुहिक समारंभाच्या ठिकाणी नियंत्रित संख्या ठेवणे, कोरोनासंदर्भातील लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीं, अधिकारी व उद्योगातील आस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिक व कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.
तत्पुवी जिल्हाधिकारी गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी मूल येथील कन्नमवार सभागृहात देखील मूल व पोंभुर्णा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचेशी संवाद साधून कोरोना नियमांची त्रिसुत्री पाळण्याबाबत आपापल्या कार्यक्षेत्रात जनजागृती करण्याचे आवाहन केले. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी गुल्हाने आता सोमवारी भद्रावती व वरोरा तालूक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचेशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे, महादेव खेडकर, नगरपालिकेचे विजयकुमार सरनाईक, सिद्धार्थ मेश्राम, तहसिलदार संजय राईंचवार, डॉ. रविंद्र होळी, डॉ. निलेश खलके, पोलीस निरीक्षक सतिषसिंह राजपूत तसेच किरणकुमार धनावडे, जयंत कातकर, रमेश कुळसंगे, सी. जे. तेलंग, अजय मेकलवार नगर परीषद व तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.