महाराष्ट्र राज्यात दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू Maharasbtra Corona

महाराष्ट्र राज्यात  दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण,

 351 जणांचा मृत्यू

मुंबई,19 अप्रैल : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध अजून कडक करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशावेळी राज्यात आज दिवसभरात 58 हजार 924 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 52 हजार 412 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास 10 हजारांनी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. राज्यात काल दिवसभरात तब्बल 68 हजार 631 रुग्ण आढळून आले होते. 

आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोहोचली आहे. त्यातील 31 लाख 59 हजार 240 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 76 हजार 520 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईतही लॉकडाऊनचा परिणाम दिसून येत आहे. कारण दिवसेंदिवस वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा घटल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दिवसभरात 7 हजार 381 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 583 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 86 हजार 622 रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत.
मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 83 टक्क्यांवर आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवसांवर आलाय. मुंबईत सध्या 86 हजार 410 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नागपुरातील कोरोना स्थितीही दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढत आहे. नागपुरात आज दिवसभरात 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 4 तासांत 7 हजार 374 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 97 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यूचं प्रमाण वाढत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 587 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 6 हजार 473 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात दिवसभरात 76 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 22 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 54 हजार 696 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 267 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 824 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 10 हजार 965 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर 6 हजार 163 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.