चंद्रपुर जिल्ह्यात शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद Chandrapur College Closed

शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच पाचवी ते नववी पर्यंत व अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त शालेय वर्गापाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत व सर्व माध्यमांचे वरीष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, अभिमत विद्यालये, कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत असलेले वर्ग तात्पुरते स्वरुपात दि. 5 एप्रिल 30 एप्रिल 2021 या कालावधीकरीता बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी दिले आहेत.

आदेशात नमुद केलेनुसार वरील शैक्षणिक वर्ग केवळ ऑनलाईन सुरु ठेवण्यास परवानगी राहील. शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमित आवश्यकतेनुसार महाविद्यालयात उपस्थित राहतील. शिक्षक तसेच प्राध्यापक महाविद्यालयात येऊन ऑनलाईन वर्ग घेतील तसेच बारावी बोर्ड किंवा महाविद्यालयीन परीक्षेकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करतील.
राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे
पालन करणे सर्वसंबधीतांना बंधनकारक राहील. सदर आदेशाची कोणतेही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा अन्वये  कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.