एप्रिल महिन्यात प्रत्येक दिवसाला जवळपास दोन पत्रकारांचा देशात कोरोनानं बळी #CoronaPatrakar

एप्रिल महिन्यात प्रत्येक दिवसाला जवळपास दोन पत्रकारांचा देशात कोरोनानं बळी घेतलाय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर पत्रकारिता क्षेत्राला मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय

दिल्लीच्या परसेप्शन स्टडीज संस्थेनं केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली

मुंबई, 30 एप्रिल:  रोहित सरदाना यांच्या मृत्यूमुळे अख्खं पत्रकारितेचं विश्व हादरुन गेलं असतानाच एकट्या एप्रिल महिन्यात देशभरात तब्बल 52 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. म्हणजे गेल्या 28 दिवसात दिवसाला जवळपास दोन पत्रकारांचा देशात कोरोनानं बळी घेतलाय.

 दिल्लीच्या परसेप्शन स्टडीज संस्थेनं केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान एका वर्षाची आकडेवारी पाहिली तर एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या काळात जवळपास 101 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय कोरोनानंतर शरीरात झालेल्या गुंतागुंतीमुळे इतर 50 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या मृत्यूंमध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील पत्रकारांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसतंय. गेले वर्षभर देशभरात कोरोनानं हाहा:कार माजवला असतानाची ग्राऊंडवरील नेमकी परिस्थिती मांडण्यासाठी फिल्ड रिपोर्टर्स तर न्यूजरुममध्ये संपादकीय विभागातील लोक दररोज लोकांच्या संपर्कात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर पत्रकारिता क्षेत्राला मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय.