केंद्र सरकारची परवानगी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेने मानले पंतप्रधानांचे आभार
मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहीमेला लसीच्या तुटवड्यामुळे ब्रेक लागत होता. अशावेळी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावं, तसंच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची हाफकिनला भेट
20 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशावेळी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले. “मी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषय मांडला आहे. हाफकिन ही देशाला पोलिओ मुक्त करणारी संस्था आहे. तिची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता आहे”, असं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते.
‘भारत बायोटेकचं तंत्रज्ञन हाफकिनलाही मिळावं’
भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं. महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करुन हाफकिनकडून लस निर्मिती करेल. अथवा महाराष्ट्र सरकारच्या सर्व संसाधनांचा वापर करुन केंद्रानं सर्व पुरवठा करावा, आम्ही फक्त ‘फिल अॅन्ड फिनिश’ करुन ते केंद्राला देण्यात येईल, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लावून धरली होती. या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती तेव्हा टोपे यांनी दिली होती. ही मागणी मान्य झाल्यास या द्वारे जे उत्पादन होईल त्यातील 25 टक्के वाटा महाराष्ट्राला देण्याची अट घातली जाईल, असंही टोपे म्हणाले होते.