उद्या 22 एप्रिलपासून लागू
नियम काय?
राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
मुंबईः महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हा कडक लॉकडाऊन राहणार आहे. मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील.
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास
आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.
खासगी बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल. खासगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यानेच मारणे बंधनकारक आहे.
राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत एक अतिरिक्त व्यक्ती यांनी तिकीट आणि पास दिले जातील. यांनाच फक्त लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेलमधून प्रवास करता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे नियम लागू नसतील.
अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
याव्यतिरिक्त इतर सर्व नियम हे १३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार लागू असतील, असे सांगण्यात आले आहे.