2 दिवसांत निर्णय होणार,
निर्बंध 8 की 14 दिवस?
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. 8 दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र राज्यात आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरीबांचं नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरुही नको, मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरचं मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झालं पाहिजे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.