कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू, नव्या व्हेरिएंटची चाचपणी करण्याची ICMR ला विनंती #CoronaNewsStrain #ICMR

कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू, 

नव्या व्हेरिएंटची चाचपणी करण्याची ICMR ला विनंती

अलीगढ :  कोरोनाच्या महामारीचा कहर देशात सुरु आहे, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांचं अपरिमित नुकसान होतंय. देशात अशा नुकसानीच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातलं ऐतिहासिक अलीगढ मुस्लीम विद्यापीठ…गेल्या 20 दिवसांत या विद्यापीठातले तब्बल 26 प्राध्यापक कोरोनाचे बळी ठरलेत. 

26 प्राध्यापक, 18 शिक्षकेतर कर्मचारी…एकाच विद्यापीठात अशा एकूण 44 जणांचा मृत्यू…तोही अवघ्या 20 दिवसांत…देशातल्या अत्यंत ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित अलीगढ मुस्लीम विद्यापीठातला हा प्रकार धक्कादायक आहे..इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचं थैमान सुरु असल्यानं इथे कोरोनाचा कुठला नवा विषाणू कार्यरत आहे का याची चाचपणी करा अशी मागणी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आयसीएमआरला पत्र लिहून केली आहे.

गेल्या 20 दिवसांत अलीगढ मुस्लीम विद्यापीठानं 26 प्राध्यापक गमावले आहेत…हे सगळे प्राध्यापक वेगवेगळ्या विषयांतले तज्ज्ञ होते, पीएचडी धारक होते... 16 जण सेवेत होते, तर 10 निवृत्त होते शिवाय शिक्षकेतर स्टाफमधले मृत्यू धरले तर हा आकडा जवळपास पन्नाशीच्या आसपास पोहचतो. कोरोनानं या ऐतिहासिक विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठाच आघात केला आहे.