Corona Virus Update : चिमुकल्यांवर घरीच कोणतंही औषध देऊन उपचार करु नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #PreventionOfCovid-19InChildren #Maharashtra’sPediatricTaskforce

Corona Virus Update :
चिमुकल्यांवर घरीच कोणतंही औषध देऊन उपचार करु नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये

मुंबई : कोरोना काळात आपण घरातच राहून काम करत असल्यामुळे विरोधकांकडून होणारी टीकेची झोड आणि एकंदर परिस्थितीची आपल्याचा जाणिव असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राचीच असल्याचं म्हणत त्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेत पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी आवाहन केलं. 

आज रविवारी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही धोका असल्याचं सांगण्यात आलं असलं तरीही या चिमुकल्यांच्या पालकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेला धीर दिला. 
लहान मुलांच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला पाळा आणि चिमुकल्यांवर घरीच कोणतंही औषध देऊन उपचार करु नका, असं महत्त्वाचं आवाहन त्यांनी केलं. कोरोना काळातील संकटांचा आढावा घेत राज्य शासन सर्वतोपरी पावलं उचलत असून, नागरिकांनीही आतापर्यंत सहकार्य केलं तसंच यापुढंही करालं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या संकटाची तीव्रता पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कठोर होता, पण लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत आपली कटुपणा घेण्याची तयारी आहे असं म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली. राज्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळंच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.