लॉकडाऊनच्या प्रश्नावर पर्यावरण मंत्री आदित्य
ठाकरेंचं रोखठोक उत्तर
मुंबई : कोरोनाचं संकट पाहता महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. आता हा लॉकडाऊन 1 जूनपासून शिथील करणार की वाढवणार याबाबत व्यापाऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र लगेचच सर्व काही उघडणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका , गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.
लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. मागच्यावेळी लॉकडाऊन हटवल्यानंतर आकडे अचानक वाढले. आता आकडे जरी कमी असले तरी लगेचच सर्व काही सुरु होणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
लॉकडाऊनबद्दल आताच काही सांगू शकत नाही. लोकांचे जीव वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. मागच्या वेळी लॉकडाऊन थोडा उगडला तेव्हा 11 हजार च्या आसपास केसेस गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबद्दल आताच काही सांगू शकत नाही पण लगेचच सगळं काही उघडणार नाही हे निश्चित आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं 13 मे रोजी घेतला होता. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं होता. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत.